फोमेंतो रिसोर्सेसकडून खाण सुरक्षेसाठी त्रिपक्षीय समितीची बैठक

खाण सुरक्षा महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांसह व्यवस्थापन, कामगार, कंत्राटदार प्रतिनिधींचा सहभाग

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
1 hours ago
फोमेंतो रिसोर्सेसकडून खाण सुरक्षेसाठी त्रिपक्षीय समितीची बैठक

पणजी : फोमेंतो रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेडतर्फे खाण खात्याच्या सुरक्षेविषयक १२व्या राष्ट्रीय परिषदेतील शिफारशींची अंमलबजावणी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्रिपक्षीय सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली. खाण सुरक्षा महासंचालनालयाचे अधिकारी, कालय मिनरल ब्लॉक व अडवलपाल-तिवरे मिनरल ब्लॉकचे खाण व्यवस्थापन, कामगार तसेच कंत्राटदारांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी खाण सुरक्षा महासंचालनालयाचे उपमहासंचालक विपुल बिहारी सतियार होते. तसेच संचालक खाण सुरक्षा (गोवा क्षेत्र) रमेश वालीकर, संचालक खाण सुरक्षा (विद्युत) अर्क सोमायाजुलू धुलिपाला, संचालक खाण सुरक्षा (यांत्रिक) बाळकृष्ण पधार्थी आणि उपसंचालक खाण सुरक्षा (गोवा क्षेत्र) दीपक कुमार चंद्रमुखी उपस्थित होते.

फोमेंतो रिसोर्सेसतर्फे कालय मिनरल ब्लॉक आणि अडवलपाल-तिवरे मिनरल ब्लॉकचे नामनिर्देशित मालक राजीव कुमार, एजंट, खाण अधिकारी, कामगार तसेच कंत्राटदारांचे प्रतिनिधी संदीप मोरजकर उपस्थित होते.

बैठकीची सुरुवात राजीव कुमार यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यानंतर कामाच्या ठिकाणी जीव गमावलेल्या खाण कामगारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्व सहभागी प्रतिनिधींनी सुरक्षेची शपथ घेत सुरक्षित कार्यपद्धती आणि अपघात प्रतिबंधासाठी आपली बांधिलकी व्यक्त केली.

संदीप मोरजकर यांनी दोन्ही खनिज ब्लॉकमध्ये १२व्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली.

चर्चेदरम्यान धोके ओळखणे व त्यांचे मूल्यांकन, सातत्यपूर्ण सुरक्षा देखरेख, कामगारांचे प्रशिक्षण व जनजागृती, वैयक्तिक सुरक्षा उपकरणांचा वापर, सुरक्षित वाहतूक व साहित्य हाताळणी, आपत्कालीन तयारी, विद्युत व यांत्रिक सुरक्षा तसेच असुरक्षित परिस्थिती आणि अपघातांच्या धोक्यांची नोंद करण्यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

नियामक प्राधिकरण, खाण व्यवस्थापन, कामगार आणि कंत्राटदारांनी व्यावसायिक सुरक्षा व आरोग्याचे उच्च मापदंड कायम ठेवण्याचा आणि खाणीत तसेच परिसरात काम करणारी प्रत्येक व्यक्ती सुरक्षितपणे घरी परतेल याची खात्री करण्याचा निर्धार व्यक्त केला.

फोमेंतो रिसोर्सेसने दोन्ही खनिज ब्लॉकमध्ये सुरक्षा यंत्रणा, वैधानिक पालन आणि सुरक्षा संस्कृती सातत्याने अधिक बळकट करण्याची बांधिलकी पुन्हा व्यक्त केली. विजय केळकर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

खाण सुरक्षा ही सामूहिक जबाबदारी

खाण सुरक्षा ही सामूहिक जबाबदारी असून खाणकामाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी संभाव्य धोके आधीच ओळखून त्यांचे निराकरण करण्याच्या प्रतिबंधात्मक दृष्टिकोनावर भर देण्यात आला. नियमित जोखीम मूल्यांकन, प्रभावी देखरेख, सातत्यपूर्ण सुरक्षा प्रशिक्षण तसेच कामगार आणि कंत्राटदारांचा सुरक्षा व्यवस्थापनात सक्रिय सहभाग यांचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले. 

हेही वाचा
सर्व पहा