गोवन वार्ता। प्रतिनिधी
पणजी : गोवा कदंब वाहतूक महामंडळाच्या ९०हून अधिक बस सेवेतून हटविण्यात आल्या असून, त्यांच्या जागी २५०हून अधिक नव्या बस सेवेत दाखल करण्यात आल्या आहेत. यातील ४५ टक्के बस इलेक्ट्रिक आहेत. तसेच कदंबच्या जुन्या बसना स्क्रॅपिंग धोरणांतर्गत सेवेतून हटविण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती कदंब वाहतूक महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीत आतापर्यंत ९३ बस सेवेतून हटविण्यात आल्या असून, आणखी ९ बस सेवेतून हटविण्याचा प्रस्ताव आहे. अशा प्रकारे सेवेतून बाहेर पडलेल्या १०२ बसची जागा २७३ नव्या बसनी घेतली आहे. यामध्ये कदंब महामंडळाच्या मालकीच्या १४८ बस आहेत, तर कंत्राटदारांकडून ‘आऊटसोर्स’ केलेल्या १२५ इलेक्ट्रिक बस आहेत.
२०२२-२३ मध्ये ४७ बस सेवेतून हटविण्यात आल्या. २०२३-२४ मध्ये एकही बस हटविण्यात आली नाही. २०२४-२५ मध्ये २८, तर २०२५-२६ मध्ये आतापर्यंत १८ बस सेवेतून हटविण्यात आल्या आहेत. सध्या १० नव्या टाटा १६१८ बस आंतरराज्य वाहतूक सेवेत तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय भविष्यात ३ मिनी बस, ४ लक्झरी तसेच स्लीपर बस आणि २४ सेमी-लक्झरी बस घेण्याचा प्रस्ताव आहे. ९ मीटर लांबीच्या आणखी २३ इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. १५ वर्षे जुन्या असलेल्या कदंबच्या १९५ बसना स्क्रॅपिंग धोरणाअंतर्गत सेवेतून हटविण्याचा प्रस्तावही सरकारसमोर ठेवण्यात आला आहे.
...
बॉक्स
कमी झालेल्या बसच्या जागी नव्या बस
वर्ष कदंबच्या मालकीच्या आऊटसोर्स केलेल्या
२०२२-२३ ० ५४
२०२३-२४ ४८ ३९
२०२४-२५ ५७ ०
२०२५-२६ ४३ ३२


