सरपंच जेर्सन गोम्स मारहाणप्रकरणी माल्कम परेराला अटक करण्याची मागणी

आपची राज्यव्यापी मोहीम : नेत्यांनी घेतली कुंकळ्ळी पोलिसांची भेट

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
just now
सरपंच जेर्सन गोम्स मारहाणप्रकरणी माल्कम परेराला अटक करण्याची मागणी

कुंकळ्ळी पोलीस स्थानकात संशयित परेराच्या अटकेची मागणी करताना आपचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, आमदार क्रूझ सिल्वा, आमदार व्हेंझी व्हिएगस व इतर.

मडगाव : चिंचणीचे सरपंच तथा आम आदमी पक्षाचे कार्याध्यक्ष जेर्सन गोम्स यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी संशयित माल्कम परेरा याला तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी आपच्या नेत्यांनी बुधवारी कुंकळ्ळी पोलीस ठाण्यात धाव घेतली. संशयिताने तपासात सहकार्य केले असून, त्याच्या अटकपूर्व जामिनाला पोलीस विरोध करणार असल्याचे निरीक्षक डायगो ग्रॅसिअस यांनी स्पष्ट केले.
आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, आमदार क्रूझ सिल्वा, आमदार व्हेंझी व्हिएगस, पक्षाचे पदाधिकारी आणि चिंचणीतील ग्रामस्थांनी पोलिसांची भेट घेतली. संशयिताला अटक करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू होते. मात्र, अटक न झाल्याने आंदोलकांमध्ये नाराजी होती. जेर्सन गोम्स यांच्या ९४ वर्षीय आईनेही मुलाला न्याय मिळावा, या मागणीसाठी आंदोलनात सहभाग घेतला.
सरपंचावर हल्ला होऊनही संशयित खुलेआम फिरत असेल, तर सामान्य नागरिक किती सुरक्षित आहेत, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. या प्रकरणाला व्यापक स्वरूप देत राज्यातील विविध भागांत सरकारच्या कथित ‘गुंडाराजा’विरोधात जनजागृती मोहीम राबविण्याची घोषणा आपने केली.
जेर्सन गोम्स यांना मारहाण केल्याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी माल्कम परेराविरोधात गुन्हा नोंदवला आहे. गुन्ह्यासाठी पाच वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असल्याने त्याला नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार माल्कम बुधवारी सकाळी पोलीस ठाण्यात हजर झाला आणि चौकशीसाठी सहकार्य केले. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला आहे.
दरम्यान, माल्कम परेराने दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. यावेळी पोलीस जामिनाला विरोध करणार असल्याचे पोलीस निरीक्षक डायगो ग्रॅसिअस यांनी सांगितले.
आप नेत्यांची सरकारवर टीका
- वाल्मिकी नाईक यांनी सरकारवर टीका करताना, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांवरील हल्ल्यांतील संशयितांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. गोव्यात ‘गुंडाराजाला’ खतपाणी घातले जात असून, त्याविरोधात गोमंतकीयांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
- आमदार क्रूझ सिल्वा यांनी ९४ वर्षीय आईला न्यायासाठी पोलीस ठाण्यात यावे लागणे ही पोलीस व्यवस्थेसाठी लाजिरवाणी बाब असल्याचे म्हटले. आमदार व्हिएगस यांनीही भाजपशी संबंधित व्यक्तींवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत सरकारवर निशाणा साधला.                

हेही वाचा
सर्व पहा