भारतीय हॉकी संघाचे ज्युनियर आशिया कपमध्ये वादळ

चायनीज तैपेईचा १५-० ने धुव्वा उडवत दिमाखात गाठली उपांत्य फेरी

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
09th September, 11:51 pm
भारतीय हॉकी संघाचे ज्युनियर आशिया कपमध्ये वादळ

मोजी : एएचएफ ज्युनियर हॉकी आशिया कप २०२६ च्या पूल-ए मधील शेवटच्या सामन्यात गतविजेत्या भारतीय संघाने आक्रमक खेळ करत चायनीज तैपेईचा तब्बल १५-० अशा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाने दिमाखात स्पर्धेच्या उपांत्य फेरीत (सेमीफायनल) प्रवेश केला आहे. कर्णधार अनमोल एक्का याने सामन्यात ६ गोल करत विजयात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली.
सामन्याच्या सुरुवातीला पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाला गोल करण्यात यश आले नाही, कारण चायनीज तैपेईच्या बचावात्मक फळीने भारताचे प्रयत्न हाणून पाडले. मात्र, दोन मिनिटांच्या विश्रांतीनंतर प्रशिक्षक फ्रेडरिक सोयेझ यांनी खेळाची रणनीती बदलत वेग वाढवण्यास सांगितला. यानंतर दुसऱ्या क्वार्टरपासून भारतीय खेळाडूंनी सामन्यावर पूर्ण ताबा मिळवला.
आर्यन झेस, प्रभदीप सिंह आणि गुरसेवक सिंह यांनी सलग पाच मिनिटांत तीन गोल करत आघाडी मिळवून दिली. त्यानंतर कर्णधार अनमोलने दोन तर अर्जुन संतोष हर्गूडेने एक गोल करत मध्यांतापर्यंत भारताची धावसंख्या ६-० अशी पोहोचवली. मध्यांतरानंतरही भारताचा आक्रमक खेळ सुरूच राहिला.
कर्णधार अनमोल एक्काचे विक्रमी ६ गोल
पेनल्टी कॉर्नरचे अचूक गोलमध्ये रूपांतर करण्यात कर्णधार अनमोल एक्का यशस्वी ठरला. त्याने सामन्यात सलग पेनल्टी कॉर्नरचे गोल करत आपली हॅटट्रिक पूर्ण केली आणि एकापाठोपाठ एक एकूण ६ गोल नोंदवले. अनमोलचे हे सर्व ६ गोल पेनल्टी कॉर्नरद्वारे झाले, जी या सामन्याची सर्वात मोठी खूण ठरली. हर्पालने दोन, तर आर्यन झेसनेही दोन गोल जोडत भारताची आघाडी १५-० वर नेऊन ठेवली. ३५ व्या मिनिटाला अजित यादवनेही गोल नोंदवला.
पूल-ए मध्ये १० गुणांसह अव्वल स्थान
या शानदार विजयासोबतच ५ वेळा चॅम्पियन राहिलेल्या भारतीय संघाने पूल-ए मध्ये १० गुणांसह आपले अभियान अव्वल स्थानी पूर्ण केले. भारताने तीन सामने जिंकले तर एक सामना अनिर्णित राखला. या गटातून दक्षिण कोरिया ९ गुणांसह दुसऱ्या स्थानी राहत उपांत्य फेरीत पोहोचली आहे. तर जपान, इंडोनेशिया आणि चायनीज तैपेई स्पर्धेतून बाहेर पडले असून आता ते वर्गीकरण सामने (क्लासिफिकेशन मॅचेस) खेळतील. आपले विजेतेपद कायम राखण्यासाठी भारतीय संघ आता उपांत्य फेरीच्या लढतीसाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे.