पणजी : उज्ज्वला योजनेचे लाभ घेणाऱ्या महिलांचे गृहआधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे लाभ सुरूच राहणार. लोकांनी विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नये, आज अतिरिक्त अर्जांचे वाटप मोठ्या प्रमाणात झाले, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
वर्षाला तीन सिलिंडर मोफत देणाऱ्या गोवा उज्ज्वला योजनेसंदर्भात लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज व्हिडीओ संदेशाद्धारे हा संभ्रम दूर केला.
उज्ज्वला योजनेचे अर्ज सर्व पंचायत, नगरपालिका आणि आमदारांच्या कार्यालयात पोहोचले आहेत. आज अतिरिक्त अर्ज मोठ्याप्रमाणात पोहोचले आणि त्याची माहितीही नागरी पुरवठा खात्याने दिली आहे. प्रथम पातळीवर एकाच अर्जावर ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीत तपशील भरून घेतात, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ‘अ’ श्रेणी ही गृहआधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजना घेणाऱ्या महिलांसाठी आहे. त्यांना अर्ज भरून द्या म्हणून सांगितले आहे. जेणेकरून आम्ही त्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात सुटसुटीत रितीने टाकू शकणार. त्यासाठी प्रथम पातळीवर आमच्या अडीच लाख बहिणींसाठी गोवा उज्ज्वला योजनेचे पैसे उद्या आणि परवा त्यांच्या खात्यात घातले जाणार, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी
दिली.
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नये : मुख्यमंत्री
‘ब’ श्रेणी ही जी महिला गृहआधार याेजनेचा लाभ घेत नाही किंवा ज्या घरात दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ महिला घेत नाही, पण तिचा पती घेत असेल तर त्या महिलेने हे फॉर्म भरावेत. प्रक्रिया सुटसुटीत करून त्यांच्या खात्यात पैसे टाकण्यासाठी चार दिवस लागू शकतात, असे मुख्यमंत्री म्हणाले. ही योजना तुम्ही घेतल्यास तुमचे गृहआधार आणि दयानंद सामाजीक सुरक्षा योजना बंद होणार. पैसे परत द्यावे लागणार, असा अपप्रचार विरोधकांनी सुरू केला आहे. भाजप सरकारने कधीच योजनेचे दिलेले पैसे परत घेतले नाहीत. तसेच एखादी योजना सुरू करून दुसरी योजना बंद केली नाही.


