अग्निशमन सेवेची १०१ ही हेल्पलाइन '११२' या आपत्कालीन क्रमांकात विलीन

Story: प्रतिनिधी| गोवन वार्ता |
just now
अग्निशमन सेवेची १०१ ही हेल्पलाइन '११२' या  आपत्कालीन क्रमांकात विलीन

पणजी : आपत्कालीन व्यवस्थापन अधिक गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा दलाने आपली '१०१' ही हेल्पलाइन 'इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम - ११२' (इआरएसएस-११२) मध्ये विलीन केली आहे.

आग, बचावकार्य किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी नागरिकांनी आता थेट ११२ या क्रमांकावरच संपर्क साधण्याची सूचना दलाने केली आहे. दलाने याबाबत नुकतीच सूचना जारी केली आहे.

दलाने आपत्कालीन घटनांची माहिती देण्यासाठी अग्निशमन केंद्रांच्या स्थानिक लँडलाइन क्रमांकांवर कॉल करणे टाळण्याचे आवाहन केले आहे. हे लँडलाइन क्रमांक आता केवळ प्रशासकीय कामांसाठी वापरले जातील असेही दलाने स्पष्ट केले आहे. या नवीन व्यवस्थेनुसार, '१०१' या आपत्कालीन क्रमांकावर येणारे सर्व कॉल्स आपोआप 'इआरएसएस-११२' च्या मध्यवर्ती केंद्राकडे पाठवले  जातील. इआरएसएस-११२ ही डिजिटल प्रणाली कॉलची नोंद घेऊन त्वरित संबंधित जवळच्या अग्निशमन केंद्राला मदतीसाठी माहिती पाठवेल. 

या बदलाच्या काळात दलाने नागरिकांसाठी महत्त्वाच्या अन्य सूचना देखील जारी केल्या आहेत. मदत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी नागरिकांनी घटनेचे स्वरूप, अचूक पत्ता, जवळची महत्त्वाची खूण (लँडमार्क) आणि स्वतःचा संपर्क क्रमांक स्पष्टपणे सांगण्याचे आवाहन दलाने केले आहे. खोटे किंवा विनाकारण कॉल्स केल्यास गंभीर आपत्कालीन परिस्थितीत गरजूंपर्यंत मदत पोहोचण्यास उशीर होऊ शकतो, त्यामुळे या क्रमांकाचा गैरवापर करू नये असे दलाने म्हटले आहे. 

डिजिटल ट्रॅकिंग आणि मध्यवर्ती समन्वय प्रणालीमुळे राज्यातील आपत्कालीन सेवा अधिक जलद आणि कार्यक्षम होण्यास मदत होणार असल्याचे दलाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा
सर्व पहा