पणजी : अबकारी खात्याच्या पेडणे विभागातील एका क्लार्कने मद्यविक्री परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी आलेल्या अनेकांना सुमारे दोन कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. घोटाळेबाज क्लार्क पेडण्याचाच असून, खात्याने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अबकारी खात्याच्या पेडणे विभागात मद्यविक्री परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी येणार्या परवानाधारकांना इंटरनेट बंद असल्याचे सांगत संबंधित क्लार्क त्यांच्याकडून पैसे घ्यायचा. आपण तुमचे पैसे भरतो आणि परवान्याचे नूतनीकरण करून देतो अशी हमी तो द्यायचा. त्याच्यावर विश्वास ठेवून काही जणांनी त्याच्याकडे पैसेही दिले. त्यापैकी काही जणांचे पैसे त्याने भरले. पण काही जणांना गंडवून त्याने त्यांना पैसे भरल्याच्या बनावट पावत्या तसेच परवाने नूतनीकरण केल्याच्या प्रतीही दिल्या. त्यावर अबकारी निरीक्षकांची सहीही आहे.
अबकारी खात्याने परवाने नूतनीकरणासाठी नोटीसा पाठवण्यास सुरुवात केल्यानंतर ज्यांना बनावट पावत्या मिळाल्या होत्या, त्यांना आपण फसलो गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी अबकारी खात्याच्या कार्यालयात धाव घेण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, संबंधित क्लार्ककडून गेल्या काही वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. काहीच दिवसांपूर्वी त्याची पेडण्यातून सत्तरीत बदलीही झालेली आहे. संबंधित क्लार्कने ज्यांना गंडवले आहे, अशांना बोलावून घेऊन खात्याचे अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत. या प्रकारामुळे अबकारी खात्याला चालू आर्थिक वर्षात सुमारे दोन कोटींचा फटका बसला आहे. या क्लार्कने आणखी किती जणांना टोपी घातली आहे, याचा अधिकारी शोध घेत आहेत.

