गणेशोत्सवापूर्वी गोमंतकीयांना दिलासा; फलोत्पादन महामंडळाकडून ५५ हजार नारळ उपलब्ध

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नारळाचे वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी गोवा फलोत्पादन महामंडळाने ५५ हजार नारळ उपलब्ध केले असून, बुधवारी सुमारे १,२०० हॉर्टिकल्चर केंद्रांवरून ३५ ते ४० रुपयांत विक्री सुरू होईल.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
4 hours ago
गणेशोत्सवापूर्वी गोमंतकीयांना दिलासा; फलोत्पादन महामंडळाकडून ५५ हजार नारळ उपलब्ध

पणजी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बाजारपेठेत नारळाचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांना रास्त दरात नारळ उपलब्ध करून देण्यासाठी 'गोवा राज्य फलोत्पादन महामंडळाने' (GSHCL) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महामंडळाकडून गणेशोत्सवासाठी तब्बल ५५ हजार नारळ उपलब्ध केले जात असून, यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

उपलब्ध करण्यात आलेल्या एकूण ५५ हजार नारळांपैकी सुमारे २० हजार नारळ स्थानिक पातळीवरून खरेदी करण्यात आले आहेत, तर उर्वरित ३५ हजार नारळ परराज्यातून मागवण्यात आले आहेत. या नारळांचे वितरण बुधवारपासून राज्यभरातील सुमारे १,२०० हॉर्टिकल्चर केंद्रांवरून सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नारळाच्या आकारानुसार त्यांचा अपेक्षित दर प्रतिनारळ ३५ ते ४० रुपयांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उपलब्ध साठा प्रत्यक्षात दाखल झाल्यानंतर आणि खरेदीचा अंतिम खर्च निश्चित झाल्यावर या दरांवर अधिकृत शिक्कामोर्तब केले जाईल.

आगामी गणेशोत्सवामुळे बाजारात नारळाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे बाजारात नारळाचे भाव प्रतिनारळ ४५ ते ७० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत फलोत्पादन महामंडळाच्या या निर्णयामुळे सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांना माफक दरात नारळ मिळणे सोपे होणार असून, बाजारातील कृत्रिम दरवाढीला आळा घालण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा