पर्वरी उड्डाणपूल सज्ज, मात्र खरी परीक्षा ११ सप्टेंबरपासून!

पर्वरीतील ५.१५ किमीच्या उड्डाणपूलाचे ९ सप्टेंबरला उद्घाटन होऊन ११ सप्टेंबरपासून तो वाहतुकीसाठी खुला होईल. यावरून दररोज ८० हजार वाहने धावण्याचा अंदाज असून जंक्शनवरील वाहतूक व्यवस्थापनाची खरी कसोटी यानंतरच लागेल. वाहतूक कोंडी सुटणार की नवे अडथळे निर्माण होणार? वाचा सविस्तर

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
9 mins ago
पर्वरी उड्डाणपूल सज्ज, मात्र खरी परीक्षा ११ सप्टेंबरपासून!

पणजी : उत्तर गोव्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उभारण्यात आलेला ५.१५ किलोमीटर लांबीचा पर्वरीचा सहा पदरी एलिवेटेड कॉरिडॉर अखेर वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. या भव्य सहापदरी उड्डाणपुलाचे उद्घाटन ९ सप्टेंबर रोजी होत असून, ११ सप्टेंबरपासून तो प्रत्यक्ष वाहतुकीसाठी खुला केला जाईल. अभियांत्रिकी दृष्टीने हा ५.१५ किमीचा मार्ग पूर्ण करणे हे जरी मोठे आव्हान असले, तरी खरी परीक्षा ११ सप्टेंबरनंतरच सुरू होणार आहे. दररोज या पुलावरून हजारो वाहने वेगाने धावू लागल्यानंतर प्रत्यक्षात वाहतूक व्यवस्था कशी काम करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (राष्ट्रीय महामार्ग) माहितीनुसार, या मार्गावरून सुरुवातीला दररोज ७०,००० ते ८०,००० वाहने धावतील असा अंदाज आहे. येत्या काही वर्षांत ही संख्या १ लाखाच्या पार जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या भव्य उड्डाणपुलामुळे पर्वरीतील वर्षानुवर्षांची वाहतूक कोंडी कायमची फुटणार, की हा ताण केवळ रस्त्याच्या पुढच्या किंवा मागच्या जंक्शनवर हस्तांतरित होणार, याचे उत्तर प्रत्यक्ष वाहतूक सुरू झाल्यावरच मिळेल.

जंक्शनवरील संभाव्य अडथळे आणि ताण

या मार्गावरून वाहने वेगाने पुढे निघून जातील; पण खरी अडचण या मार्गाच्या प्रवेश (Entry) आणि निर्गम (Exit) बिंदूंवर निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः पणजीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी मांडवी पुलाजवळील जंक्शन हा सर्वात मोठा संवेदनक्षम टप्पा ठरेल. सध्या सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी मांडवी पुलाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. अशा स्थितीत पर्वरी उड्डाणपुलावरून अत्यंत वेगाने येणारी वाहने एकाच वेळी मांडवी पुलाच्या जंक्शनवर जमा झाल्यास तेथे अधिक गंभीर वाहतूक कोंडी (Bottleneck) निर्माण होऊ शकते.

या संदर्भात बोलताना उत्तर गोवा वाहतूक पोलीस उपअधिक्षक (DySP) सुदेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले की, पर्वरीतील प्रवास सोपा करणे आणि वेळेची बचत करणे हाच या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. सध्या तरी या मार्गावर कोणत्याही मोठ्या समस्येची शक्यता दिसत नाही. मात्र, प्रत्यक्ष वाहतूक सुरू झाल्यानंतरच संभाव्य त्रुटी किंवा अडचणीचे भाग स्पष्ट होतील आणि त्यानुसार वाहतूक नियोजनात आवश्यक बदल केले जातील.

पुढील २५ ते ३० वर्षांचा विचार करून रचना

सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता गजानन देसाई यांनी सांगितले की, या उन्नत मार्गाची रचना पुढील २५ ते ३० वर्षांच्या वाहतूक गरजा लक्षात घेऊन करण्यात आली आहे. दररोज १ लाखांहून अधिक वाहने सहज जाऊ शकतील अशी या पुलाची क्षमता आहे. ताशी ६० किमी वेगाने प्रवास केल्यास ५.१५ किमीचा हा टप्पा पार करण्यासाठी अवघे ५ मिनिटे लागतील.

तसेच, उड्डाणपुलाखालील स्थानिक वाहतुकीसाठीही योग्य नियोजन करण्यात आले आहे. स्थानिक गाड्या, बस आणि अंतर्गत भागात जाणारी वाहने खालच्या रस्त्याचा वापर करतील. महत्त्वाच्या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली असून ती लवकरच कार्यान्वित केली जाईल. या पुलावरून दुचाकी, चारचाकी, बस, ट्रक आणि अवजड वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहनांना परवानगी असेल.

सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव

सध्या या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) बसवण्यात आलेले नाहीत. भविष्यात वाहतूक नियंत्रणासाठी कॅमेरे बसवण्याची योजना असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात कॅमेरे नसल्याने, अपघात, वाहन बिघाड किंवा वाहतुकीदरम्यान अचानक निर्माण होणाऱ्या अडथळ्यांवर लक्ष ठेवणे हे पोलीस प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरू शकते.

नागरिकांसाठी केवळ एक दिवस चालण्याची संधी

उद्घाटनापूर्वी नागरिकांना या भव्य पुलावर चालण्याचा आनंद घेता यावा यासाठी दोन दिवसांचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, उद्घाटनाच्या मुख्य मंचाची उभारणी आणि इतर पूर्वतयारीमुळे ही संधी केवळ सोमवारपुरतीच मर्यादित ठेवण्यात आली आहे. सोमवारी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत नागरिकांना पुलावर चालण्यास परवानगी असेल. एकदा वाहनांची वाहतूक सुरू झाल्यावर या पुलावर पादचाऱ्यांना अजिबात परवानगी दिली जाणार नाही.

वर्षानुवर्षांचा बांधकामाचा त्रास, वाहतूक वळवणे आणि दैनंदिन हाल अपेष्टांनंतर अखेर हा पूल उभा राहिला आहे. ११ सप्टेंबरची सकाळ पर्वरीच्या वाहतूक इतिहासातील एक नवा अध्याय ठरेल.


हेही वाचा
सर्व पहा