कंत्राटी शिक्षकांच्या बदलीविरोधात बोर्डातील विद्यार्थ्यांचा वर्गावर बहिष्कार

बोर्डा-फातोर्डा येथील पीएम श्री शाळेत कंत्राटी शिक्षकांच्या बदलीविरोधात विद्यार्थ्यांनी वर्गावर बहिष्कार टाकला. परीक्षा तोंडावर असताना अनुभवी शिक्षकांना हटवल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. सुरुवातीला पेडणे, वाळपई, सांगे नंतर पणजी व आता मडगावातील या घटनेमुळे सरकार आणि शिक्षण खात्याच्या धोरणांवर चर्चा होत आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
3 hours ago
कंत्राटी शिक्षकांच्या बदलीविरोधात बोर्डातील विद्यार्थ्यांचा वर्गावर बहिष्कार

मडगाव: शाळेतील अनुभवी कंत्राटी शिक्षकांना तडकाफडकी काढून नव्या शिक्षकांची भरती केल्याच्या निषेधार्थ फातोर्डा येथील पीएम श्री मल्टीपर्पज हायस्कूल बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी वर्गावर बहिष्कार टाकत शाळेबाहेर जोरदार निदर्शने केली. परीक्षेला अवघे काही महिने शिल्लक असताना जुन्या शिक्षकांना हटवल्यामुळे शैक्षणिक गोंधळ निर्माण झाला आहे.

त्यामुळे शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत त्याच शिक्षकांना पूर्ववत सेवेत घेण्यात यावे, अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी फातोर्डा पोलीस आणि पालक-शिक्षक समितीने घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांशी चर्चा केली. सुरुवातीला पेडणे, वाळपई, सांगे नंतर पणजी व आता मडगावातील या घटनेमुळे सरकार आणि शिक्षण खात्याच्या धोरणांवर चर्चा होत आहे. 

इंग्रजी, समाजशास्त्र आणि इतिहास हे विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना सेवेतून हटवण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. सध्या विज्ञान विषयाच्या शिक्षकांवर समाजशास्त्र शिकवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, त्यांना या विषयाचा कोणताही अनुभव नसून परीक्षेचा अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा, याबद्दल त्या अनभिज्ञ आहेत. यामुळे वर्गात काय शिकवले जात आहे, हे समजणे कठीण झाले आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. शिक्षकांना बढती द्यायची असल्यास ती जरूर द्यावी, परंतु शैक्षणिक वर्षाच्या मध्यावर अशी प्रक्रिया करणे चुकीचे आहे. अवघ्या दोन महिन्यांवर शाळा परीक्षा आणि त्यानंतर चार महिन्यांत बोर्डाची परीक्षा असताना झालेल्या या बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

माजी नगरसेवक तथा पालक-शिक्षक समितीचे सदस्य कामिल बार्रेटो यांनी सांगितले की, सरकारने कोणतीही पूर्वसूचना न देता शिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. नव्याने नियुक्ती केलेल्या शिक्षकांबाबत पालक-शिक्षक समितीला विश्वासात घेण्यात आले नाही. गेल्या ९ ते १० वर्षांपासून तासिकेवर आधारित (कंत्राटी) काम करणाऱ्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळत होते. त्यांना अचानक काढल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत जुन्याच शिक्षकांची नेमणूक कायम ठेवावी, अशी मागणी बार्रेटो यांनी केली.

हेही वाचा
सर्व पहा