हे माहीत आहे का ? म्हादई जललोट क्षेत्र उभयचरांसाठी सर्वात समृद्ध अधिवास!

गोवा विद्यापीठाच्या अभ्यासानुसार म्हादई-साट्रे जललोट क्षेत्र उभयचरांसाठी सर्वाधिक समृद्ध अधिवास ठरले आहे. म्हादईचे पाणी वळवल्यास या सूक्ष्म-परिसंस्थेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. 'जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सा' (Journal of Threatened Taxa) या आंतरराष्ट्रीय स्तरावरील शोधपत्रिकेत प्रसिद्ध या अभ्यासात नेमके काय दडले आहे ? वाचा..

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
4 hours ago
हे माहीत आहे का ? म्हादई जललोट क्षेत्र उभयचरांसाठी सर्वात समृद्ध अधिवास!

पणजी : पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि अभ्यासपूर्ण शोधनिबंध समोर आला आहे. गोवा विद्यापीठाने नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार, गोव्यातील म्हादई नदी आणि तिची उपनदी असलेल्या साट्रेचे जललोट क्षेत्र (Satrem tributary watershed) हे उभयचर प्राण्यांसाठी (Amphibians) राज्यातील सर्वांत समृद्ध आणि सुरक्षित अधिवास असल्याचे सिद्ध झाले आहे. 'जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सा' (Journal of Threatened Taxa) या आंतरराष्ट्रीय स्तरावरील शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासाने म्हादई खोऱ्यातील सूक्ष्म-हवामान (Microclimate) आणि परिसंस्थेचे महत्त्व पुन्हा एकदा शास्त्रीय पुराव्यांसह अधोरेखित केले आहे.


Bhagwan Mahavir Wildlife Sanctuary Goa | LBB, Bangalore


गोवा विद्यापीठाच्या संशोधकांनी गोव्यातील पश्चिम घाट क्षेत्रातील १,३३५.९५ चौरस किलोमीटर परिसराचा सखोल अभ्यास केला. यामध्ये म्हादई वन्यजीव अभयारण्य, भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य, मोले राष्ट्रीय उद्यान, नेत्रावळी वन्यजीव अभयारण्य आणि खोतीगाव वन्यजीव अभयारण्य या संरक्षित क्षेत्रांमधील १२ प्रमुख जललोट क्षेत्रांतील १०२ ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले. या संपूर्ण सर्वेक्षणात उभयचरांच्या एकूण २२ प्रजातींची नोंद झाली असून, त्यात केवळ पश्चिम घाटातच आढळणाऱ्या ८ वैशिष्ट्यपूर्ण (Endemic) प्रजातींचा समावेश आहे.


Trekking Through the Mhadei Wildlife Sanctuary: A Memorable Adventure!


या संशोधनातील सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे, 'डब्ल्यु-३' (W3) म्हणून वर्गीकृत केलेल्या म्हादई-सातरेम उपनदी जललोट क्षेत्रात सर्वाधिक १९ उभयचर प्रजातींची नोंद झाली आहे. संशोधकांच्या मते, ज्या भागात वृक्षाच्छादन (Canopy cover) मध्यम स्वरूपाचे म्हणजेच ८० ते ९५ टक्के असते आणि जमिनीवर वाळलेल्या पानांचा (Leaf litter) खोल थर असतो, तिथे उभयचरांचे वैविध्य सर्वाधिक आढळते. वाळलेल्या पानांची खोली आणि हवेतील आर्द्रता जितकी जास्त, तितकी उभयचरांच्या प्रजातींची संख्या जास्त असल्याचे या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. उलटपक्षी, तापमान वाढल्यास या प्राण्यांच्या संख्येत घट दिसून येते.


Mhadei Wildlife Sanctuary - Forest in Goa Aug 2026 | ExploreBees


हा अभ्यास केवळ जैवविविधतेपुरता मर्यादित नसून, कर्नाटकसोबत सुरू असलेल्या म्हादई पाणी वाटप विवादाच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या पर्यावरणीय भूमिकेला भक्कम वैज्ञानिक बळ देणारा ठरतो. म्हादईचे पाणी वळवल्यास किंवा जलप्रवाहात बदल झाल्यास येथील सूक्ष्म-अधिवास आणि पानगळीच्या थरांवर विपरीत परिणाम होऊन उभयचरांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. त्यामुळे म्हादई खोऱ्यातील नैसर्गिक जंगल प्रवाह आणि जमिनीवरील पानांचे थर अबाधित ठेवणे अत्यावश्यक असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.


Jumping chicken' poachers keep Karnataka forest officials on their toes |  Bangalore News - The Indian Express

हेही वाचा
सर्व पहा