बटाट्यांच्या गोण्यांमागे लपवलेला तब्बल १८.७२ लाखांचा अवैध दारू साठा पोळे सीमेवर जप्त

पोळे-काणकोण सीमेवर बटाट्यांच्या गोण्यांमागे लपवून कर्नाटकात नेला जाणारा १८.७२ लाखांचा दारू साठा अबकारी खात्याने जप्त केला. अधिकाऱ्यांना चकवा देऊन चालक व क्लिनर अंधारात पसार झाले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
57 mins ago
बटाट्यांच्या गोण्यांमागे लपवलेला तब्बल १८.७२ लाखांचा अवैध दारू साठा पोळे सीमेवर जप्त

पणजी : गोवा-कर्नाटकच्या पोळे सीमेवर बटाट्यांच्या गोण्यांच्या आड लपवून केली जाणारी अवैध दारूची आंतरराज्यीय तस्करी अबकारी खात्याने (Excise Department) उधळून लावली आहे. तपासणी नाक्यावर केलेल्या या धडक कारवाईत १८ लाख ७२ हजार रुपयांचा दारू साठा आणि वाहतुकीसाठी वापरलेला साडेपाच लाख रुपयांचा ट्रक असा एकूण २४ लाख २२ हजार रुपयांचामुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास एक संशयित ट्रक गोव्यातून कर्नाटकच्या दिशेने जात होता. नाक्यावर तैनात अबकारी अधिकाऱ्यांनी ट्रकला थांबवून विचारणा केली असता, चालकाने ट्रकमध्ये बटाटे असल्याचे सांगितले. मात्र, सामान्यतः बटाट्यांची आवक कर्नाटकातून गोव्यात होते, गोव्यातून कर्नाटकात बटाटे पाठवले जात नाहीत; या विसंगतीमुळे अधिकाऱ्यांचा संशय बळावला. अधिकाऱ्यांनी ट्रकमधील मालाची सखोल तपासणी सुरू करताच, कारवाईच्या भीतीने चालक आणि क्लिनर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

त्यानंतर पथकाने ट्रकमधील मालाची झाडाझडती घेतली असता, वरच्या बाजूला बटाट्यांच्या गोण्या रचून त्यामागे शिताफीने लपवून ठेवलेले विस्कीचे तब्बल ३०० खोके आढळून आले. अबकारी अधिकारी रोहित देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रदीप खोलकर आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. पळून गेलेल्या संशयितांचा शोध सुरू असून, नाक्यावरील या सतर्कतेमुळे तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.


हेही वाचा
सर्व पहा