गोवा पोलिसांच्या कर्तबगारीचा गौरव; 'प्रेसिडेंट्स कलर' ने होणार सन्मान

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ताळगाव येथील स्टेडियमवर गोवा पोलिसांना 'प्रेसिडेंट्स कलर' प्रदान केला जाणार आहे. याच सोहळ्यात सायबर सुरक्षेसाठी १९३० हेल्पलाइनच्या AI कॉल एजंटचे उद्घाटन होईल. असे आहे वेळापत्रक.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
गोवा पोलिसांच्या कर्तबगारीचा गौरव; 'प्रेसिडेंट्स कलर' ने होणार सन्मान

पणजी : गोवा पोलिसांची उत्कृष्ट सेवा, शौर्य आणि समर्पणाचा गौरव करण्यासाठी ७ सप्टेंबर २०२६ रोजी ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर विशेष अलंकरण संचलन आणि सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक प्रसंगी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून गोवा पोलीस दलाला मानाचा 'प्रेसिडेंट्स कलर' प्रदान करणार आहेत. या सोहळ्यात सायबर सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणऱ्या '१९३० हेल्पलाइनसाठी एआय-आधारित कॉल एजंट'चे उद्घाटनही केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते केले जाईल.

नियोजित वेळापत्रकानुसार, दुपारी २:४० वाजता परेड कमांडर आणि सहाय्यक परेड कमांडर यांच्या नेतृत्वाखाली परेडची मांडणी केली जाईल. दुपारी २:५० वाजता गोवा पोलीस महासंचालकांचे (DGP) आगमन होईल आणि त्यांना जनरल सलामी दिली जाईल. यानंतर गोव्याचे मुख्य सचिव, विधानसभा अध्यक्ष, विविध मंत्री, आमदार आणि इतर मान्यवरांचे आगमन होईल. दुपारी ३:०० वाजता राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आगमन झाल्यावर मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक त्यांचे स्वागत करतील व मुख्यमंत्र्यांना सलामीच्या मंचावर नेऊन जनरल सलामी दिली जाईल.

प्रमुख पाहुणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे दुपारी ३:१० वाजता आगमन होईल. मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करतील. पोलीस महासंचालकांकडून गृहमंत्र्यांना सेरेमोनियल हॅट प्रदान केली जाईल. गृहमंत्र्यांना सलामी दिल्यानंतर त्यांच्याकडून परेडची पाहणी केली जाईल.

 त्यानंतर ३:३५ वाजता केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते गोवा पोलिसांना अधिकृतपणे 'निशाण' प्रदान केले जाईल. निशान प्रदान सोहळ्यानंतर ध्वजाला आणि मुख्य पाहुण्यांना जनरल सलामी दिली जाईल.

दुपारी ३:५० वाजता गोवा पोलीस महासंचालकांचे स्वागतपर भाषण आणि ३:५५ वाजता मुख्यमंत्र्यांचे संबोधन होईल. दुपारी ४:०५ वाजता केंद्रीय गृहमंत्री '१९३० हेल्पलाइनच्या AI कॉल एजंट'चे उद्घाटन करतील. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गृहमंत्र्यांना स्मृतीचिन्ह प्रदान केले जाईल आणि दुपारी ४:०८ वाजता गृहमंत्र्यांचे मार्गदर्शनपर भाषण होईल. दुपारी ४:३४ वाजता पोलीस महानिरीक्षकांच्या आभार प्रदर्शनाने, तसेच 'वंदे मातरम' आणि राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता होईल.

हेही वाचा
सर्व पहा