मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा : शिवसेनेची मागणी

मराठीवर अन्याय करू नये : शिवसेना नेते उपेंद्र गावकर; गोव्याच्या संस्कृतीमध्ये पूर्वापार मराठी भाषेचा समावेश आहे. त्यामुळे गोव्यात कोकणी सोबतच मराठीला देखील राजभाषेचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. याबाबत आज आम्ही तिन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. आमचा कोकणी भाषेला विरोध नाही. कोकणी आमची भाषा आहे. मात्र यामुळे मराठीवर अन्याय करू नये अशी मागणी शिवसेना नेते उपेंद्र गावकर यांनी केली.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा : शिवसेनेची मागणी

पणजी : गोव्याच्या संस्कृतीमध्ये पूर्वापार मराठी भाषेचा समावेश आहे. त्यामुळे गोव्यात कोकणी सोबतच मराठीला देखील राजभाषेचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. याबाबत आज आम्ही तिन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. आमचा कोकणी भाषेला विरोध नाही. कोकणी आमची भाषा आहे. मात्र यामुळे मराठीवर अन्याय करू नये अशी मागणी शिवसेना नेते उपेंद्र गावकर यांनी केली.

मंगळवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुनील सांतीनेजकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. गावकर यांनी सांगितले की, शिवसेनेने खूप आधीपासून मराठी भाषेला राजभाषा देण्याची मागणी केली होती. मराठी राजभाषा निर्धार समितीद्वारे विधानसभेवर काढण्यात आलेल्या मोर्चा आणि आंदोलनांला आम्ही पाठिंबा दिला होता.

आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी देखील या मागणीला पाठिंबा देणारे पत्र दिले होते. आमच्या सण, उत्सवातील आरती, भजन हे मराठीमध्येच आहे. गोव्यात मराठी नाटकांची प्रथा देखील खूप जुनी आहे. अन्य काही राज्यांत दोन राजभाषा आहेत. त्याचप्रमाणे गोव्यात देखील मराठीला राजभाषा करणे आवश्यक आहे.

ते म्हणाले, आमचा कोणतीही भाषा, समाज, सरकार, संस्थेला विरोध नाही. केवळ मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा ही न्याय मागणी आम्ही करत आहोत.  आमच्या या मागणीचा आणि महाराष्ट्र राज्याचा काहीही संबंध नाही. शिवसेना महाराष्ट्रात आहे म्हणून आम्ही अशी मागणी करत आहोत असे म्हणणे देखील चुकीचे आहे. आम्ही आपल्या सांस्कृतिक भाषेला दर्जा मिळावा अशी मागणी करत आहोत. याबाबत १९८७ मध्ये विधानसभेत ठराव झाला होता. मात्र ऐनवेळी काही लोकांनी विरोध केल्यामुळे असे करणे शक्य झाले नाही.

सरकारला पाहिजे असल्यास काहीही करता येणे शक्य आहे. याआधी विधानसभेत एका दिवसात निर्णय घेतल्याचे आम्ही पाहिले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमच्या निवडणूक जाहीरनाम्यात मराठी राजभाषा करण्याचा मुद्दा घेणार आहोत. शिवसेना आणि भाजप महाराष्ट्रात एकत्र आहेत.

गोव्यात  विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यावर युतीबाबत विचार करणार असल्याचे आमच्या वरिष्ठांनी सांगितले आहे. सध्या आम्ही राज्य सरकारला विरोध करत नसून केवळ एक मागणी करत आहोत असे गावकर यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा