वीज खात्याचे ६ अभियंते, ५ लाईनमन, २ हेल्पर निलंबित

दक्षता खाते, वीज खात्याची कारवाई : लाईनमन मृत्यूप्रकरणी दोषी


52 mins ago
वीज खात्याचे ६ अभियंते, ५ लाईनमन, २ हेल्पर निलंबित

गोवन वार्ता। प्रतिनिधी
पणजी : विजेचा शॉक लागून लाईनमनचा झालेला मृत्यू, तसेच अन्य अपघातांप्रकरणी वीज खात्यातील ६ अभियंते आणि ७ लाईन स्टाफच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. निलंबित अभियंत्यांमध्ये ३ साहायक अभियंते आणि ३ कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे. कामात दुर्लक्ष आणि निष्काळजीपणाबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. निष्काळजीपणासाठी अभियंते व लाईन हेल्पर/लाईन स्टाफवर मोठी कारवाई होण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे.
सांगेचे साहाय्यक अभियंते इमलेश गावकर, वास्कोचे साहाय्यक अभियंते विक्रम कारेकर आणि वेर्णाचे साहाय्यक अभियंते सूरज पालेकर यांच्या निलंबनाचे आदेश दक्षता संचालनालयाने जारी केले. याशिवाय वीज खात्याने वास्को, सांगे आणि डिचोली विभागातील प्रत्येकी एका अशा ३ कनिष्ठ अभियंत्यांना निलंबित केले. डिचोलीचे ४ आणि सांगेचे ३, असे ७ लाईन हेल्परनाही निलंबित करण्यात आले आहे. अशा प्रकारे एकूण ६ अभियंते आणि ७ लाईन हेल्परांवर कारवाई करण्यात आली आहे.
साहायक अभियंत्यांच्या निलंबनाचे तीन स्वतंत्र आदेश जारी करण्यात आले आहेत. केंद्रीय नागरी सेवा नियम, १९६५ मधील नियम १० आणि उपनियम १ अंतर्गत निलंबनाचे आदेश जारी झाले आहेत. निलंबनाच्या काळात साहाय्यक अभियंत्यांना मुख्य वीज अभियंत्यांच्या कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. निलंबनाच्या काळात नियमानुसार त्यांना भत्ता मिळणार आहे.
डिचोलीतील लाईनमन मृत्यूप्रकरणी जेईसह ४ लाईन हेल्पर निलंबित
अस्नोडा येथे उच्चदाब वीजवाहिनीच्या बाजूला असलेल्या झाडांच्या फांद्या तोडताना शॉक लागून एका लाईनमनचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी संबंधित कनिष्ठ अभियंता आणि ४ लाईन हेल्परांना निलंबित करण्यात आले आहे. उच्चदाब वीजवाहिनीचा वीजपुरवठा बंद न करताच तिच्या बाजूच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू करण्यात आले होते. प्राथमिक चौकशीत कनिष्ठ अभियंता आणि संबंधित लाईन हेल्पर दोषी आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती खात्यातील अधिकाऱ्यांकडून मिळाली.
सांगे येथे वीजवाहिनीवर झालेल्या अपघाताप्रकरणी एका साहाय्यक अभियंत्यासह एक कनिष्ठ अभियंता आणि ३ लाईन हेल्परांना निलंबित करण्यात आले आहे. चौकशीत साहाय्यक अभियंते इमलेश गावकर यांच्यासह अन्य कर्मचारी दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.
वास्को येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताप्रकरणी साहाय्यक अभियंते विक्रम कारेकर आणि दोन कनिष्ठ अभियंते दोषी ठरले. यापैकी सूरज पालेकर या कनिष्ठ अभियंत्याला पदोन्नती मिळाल्यानंतर साहाय्यक अभियंता म्हणून वेर्णा येथे बदली करण्यात आली होती. त्यामुळे त्यावेळी कनिष्ठ अभियंता असलेल्या सूरज पालेकर यांच्यासह एका कनिष्ठ अभियंत्याचे निलंबन करण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांना घरकामाला जुंपणारे अभियंते सावध
निलंबित झालेल्या एका अभियंत्याने एका लाईनमनला आपल्या घरकामाला जुंपल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या निलंबनानंतर आता लाईनमन, हेल्पर यांना आपल्या घरकामाला जुंपणारे अभियंते सावध झाले आहेत. काही अभियंते आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना आपल्या वैयक्तिक कामांसाठी वापरतात.
आणखीही अभियंत्यांवर होणार कारवाई
अपघात तसेच लायनमन मृत्यू प्रकरणी ६ अभियंते व ७ लायनमनना निलंबित केले असले तरी आणखीही काही अभियंत्यांना नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. यामुळे या अभियंत्यांवरसुद्धा चौकशीनंतर कारवाई होणार आहे.
नोटिसा जारी झालेले अभियंते
उदय कुडाळकर - कार्यकारी अभियंते
गंगु कुट्टीकर - कार्यकारी अभियंते
समीर चोडणकर - साहाय्यक अभियंते
निलंबित झालेले अभियंते
साईश सातार्डेकर - कनिष्ठ अभियंते
इमलेश गावकर - साहाय्यक अभियंते
अक्षय रेकडो - कनिष्ठ अभियंते
विक्रम कारेकर - साहाय्यक अभियंते
सूरज पालेकर - साहाय्यक अभियंते
राज सत्यवान मांजरेकर - कनिष्ठ अभियंते
निलंबित झालेले लाईनमन, हेल्पर
डिचोली विभाग : केदार मांद्रेकर, सुदेश गाड, प्रदीप गड्डी, प्रमोद कालकेकर.
सांगे - कुडचडे विभाग : श्रीकांत पुजारी, रितुल नाईक, घनश्याम परवार       

हेही वाचा
सर्व पहा