खराब हवामानामुळे मासेमारी हंगाम लांबणीवर पडण्याची मच्छीमारांना चिंता

कामगारांचीही टंचाई : मच्छीमारांकडून बोटी सज्ज करण्यास सुरुवात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th July, 09:49 pm

गेल्या दोन महिन्यांपासून लागू असलेला मासेमारी बंदीचा कालावधी संपत असून, येत्या १ ऑगस्टपासून राज्यात अधिकृत मासेमारी हंगामाला सुरुवात होणार आहे. मात्र, समुद्रातील प्रतिकूल हवामान आणि मजुरांची टंचाई यामुळे यंदाचा हंगाम अपेक्षेपेक्षा उशिरा सुरू होण्याची शक्यता मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. तरीही कुटबण जेटीवर बोटी आणि ट्रॉलर समुद्रात उतरविण्याची तयारी वेगाने सुरू आहे.

हवामान आणि मजुरांच्या टंचाईचे दुहेरी आव्हान

दरवर्षी जूनपासून दोन महिन्यांसाठी मासेमारी बंद असते. १ ऑगस्टपासून पारंपरिक तसेच यांत्रिक मासेमारीला मत्स्य खात्याकडून परवानगी दिली जाते. मात्र, सध्या समुद्रातील उधाण आणि वादळी हवामानामुळे मच्छीमार चिंतेत आहेत. त्यातच नौकांवर काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांची संख्या यंदा घटल्याने अनेक ट्रॉलर अद्याप समुद्रात उतरवणे शक्य झालेले नाही.

बहुतांश परप्रांतीय मजूर अद्याप गोव्यात परतले नसल्याने ट्रॉलर मालकांसमोर मनुष्यबळाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अधिकृत हंगाम सुरू झाला तरी पूर्ण क्षमतेने मासेमारी सुरू होण्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते.

कुटबण जेटीवर हंगामपूर्व लगबगअडचणी असूनही कुटबण जेटीवर बोटमालक आणि मच्छीमारांनी हंगामाच्या तयारीला वेग दिला आहे. नौकांची डागडुजी, जाळ्यांची दुरुस्ती तसेच इतर तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात असून हवामान अनुकूल होताच आणि मजूर परतल्यानंतर मासेमारी पूर्ण क्षमतेने सुरू केली जाईल, अशी माहिती बोटमालक सावियो डिसिल्वा यांनी दिली.
बोट व्यवसाय खुला करण्याच्या निर्णयाबाबत चिंता

मत्स्य खात्याकडून बोट व्यवसाय अधिक खुला करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तसे झाल्यास इतर क्षेत्रातील व्यक्तीही या व्यवसायात येऊ शकतील आणि त्याचा परिणाम सध्या या व्यवसायात कार्यरत असलेल्या मच्छीमारांवर होऊ शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बोटमालक, बोटचालक संघटना आणि मच्छीमारांशी सविस्तर चर्चा करावी, अशी मागणी बोटमालक सावियो डिसिल्वा यांनी केली.