दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या जागतिक क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला आहे. भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याने न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलला मागे टाकत एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा एकदा जगातील प्रथम स्थान प्राप्त केले आहे. दुसरीकडे, १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने टी-२० क्रमवारीत तब्बल २३० स्थानांची मोठी झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम ४८ वा क्रमांक पटकावला आहे.
गेल्या आठवड्यात शुभमन गिल आणि अव्वल स्थानी असलेल्या डॅरिल मिचेल यांच्यात अवघ्या १ रेटिंग पॉईंटचा फरक होता. न्यूझीलंडच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांतील अनुपस्थितीमुळे शुभमनने ८०१ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे, तर मिचेल दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. याशिवाय, भारताचे दिग्गज फलंदाज विराट कोहली (तिसरे स्थान) आणि रोहित शर्मा (चौथे स्थान) यांनी एकदिवसीय क्रमवारीतील पहिल्या पाचमधील आपले स्थान कायम राखले आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध हरारे येथे पार पडलेल्या टी-२० मालिकेत ३-० अशा निर्भेळ यशात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने महत्त्वपूर्ण योगदान दिले. या मालिकेत त्याने ५०.३३ च्या सरासरीने १५१ धावा फटकावत ‘मालिकावीर’ पुरस्कार पटकावला.
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यांनंतर पुनरागमन करताना त्याने अवघ्या १८ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. या कामगिरीच्या जोरावर वैभवने ५३६ रेटिंग गुणांसह जागतिक क्रमवारीत थेट ४८ व्या स्थानावर धडक मारली आहे.
इशान किशन टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी कायम; विराट-सूर्याचा विक्रम मोडला
टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत इशान किशन याने ९१० गुणांसह आपले पहिले स्थान भक्कम राखले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ८१ धावांची उत्कृष्ट खेळी केल्यानंतर इशानने ९१६ या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग गुणांची नोंद केली होती.
आयसीसी टी-२० इतिहासातील ही तिसरी सर्वोच्च ऑल-टाइम रेटिंग ठरली असून, त्याने या बाबतीत भारताचा अभिषेक शर्मा (९३१) आणि इंग्लंडचा डॅव्हिड मलान (९१९) यांच्यापाठोपाठ स्थान मिळवले आहे. यासह इशानने विराट कोहली (९०९) आणि सूर्यकुमार यादव (९१२) यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग गुणांचा विक्रम मागे टाकला आहे.
इतर भारतीय खेळाडूंची प्रगती
तिलक वर्मा टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत दोन स्थानांची सुधारणा करत ६ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रेयस अय्यरने सात स्थानांची झेप घेत त्याने २४ वे स्थान मिळवले आहे. रवी बिश्नोई गोलंदाजांच्या टी-२० क्रमवारीत ३१ स्थानांची मोठी प्रगती करत ४१ व्या क्रमांकावर आला आहे.


