Home >> क्रीडा >> सर गॅरी सोबर्स यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन

सर गॅरी सोबर्स यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन

बार्बाडोस येथील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
17th July, 11:31 pm
सर गॅरी सोबर्स यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन

बार्बाडोस : वेस्ट इंडिजचे महान आणि दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. बार्बाडोस येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. क्रिकेटच्या इतिहासातील ‘सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोबर्स यांच्या निधनाने क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.
सर गॅरी सोबर्स यांच्या निधनाचे वृत्त समजताच क्रिकेट वेस्ट इंडिजने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर भावूक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिले, एक महान खेळी आज समाप्त झाली. आमच्या हृदयात, आता आणि कायमचे... सर गार्फिल्ड सोबर्स!
अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांच्या नावावर क्रिकेटमधील अनेक अद्वितीय विक्रम आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकाच षटकात ६ षटकार ठोकणारे ते जगातील पहिले फलंदाज ठरले. त्यांनी १९६८ मध्ये नॉटिंगहॅमशायरकडून खेळताना ग्लॅमॉर्गनच्या मॅल्कम नॅशच्या गोलंदाजीवर हा पराक्रम केला होता. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी, म्हणजेच १९५८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध सबिना पार्क येथे नाबाद ३६५ धावा फटकावून त्यांनी लेन हटन यांचा कसोटीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विश्वविक्रम मोडला. हा विक्रम तब्बल ३६ वर्षे (१९९४ पर्यंत) कायम होता, जो पुढे वेस्ट इंडिजच्याच ब्रायन लाराने मोडला.
गॅरी सोबर्स हे केवळ उत्कृष्ट फलंदाज नव्हते, तर ते डावखुरे वेगवान गोलंदाज असण्यासोबतच ऑर्थोडॉक्स आणि रिस्ट स्पिन गोलंदाजीही तितक्याच प्रभावीपणे करायचे. याशिवाय ते एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही होते.
कसोटी कारकीर्द (१९५४ - १९७४)
त्यांनी वेस्ट इंडिजसाठी ९३ कसोटी सामने खेळले. यात ५७.७८ च्या सरासरीने ८,०३२ धावा केल्या (ज्यात २६ शतकांचा समावेश आहे) आणि ३४.०३ च्या सरासरीने २३५ बळी घेतले.
त्यांनी वेस्ट इंडिज, बार्बाडोस, नॉटिंगहॅमशायर आणि साऊथ ऑस्ट्रेलियासाठी ३८३ सामने खेळताना ५४.८७ च्या सरासरीने २८,३१४ धावा केल्या आणि १,०४३ बळी घेतले.
त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या शेवटी एकदिवसीय क्रिकेटची सुरुवात झाली होती, ज्यामुळे ते आपल्या कारकिर्दीत केवळ एकच एकदिवसीय सामना (१९७३ मध्ये इंग्लंडविरुद्ध) खेळू शकले.
‘सर’ पदवी आणि आयसीसीचा सर्वोच्च सन्मान
क्रिकेटमधील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी १९७५ मध्ये त्यांना ब्रिटनकडून ‘नाईटहूड’ बहाल करून ‘सर’ या पदवीने सन्मानित करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदतर्फे दरवर्षी दिला जाणारा वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा मानाचा पुरस्कार आजही त्यांच्याच सन्मानार्थ ‘सर गार्फिल्ड सोबर्स ट्रॉफी’ म्हणून ओळखला जातो. त्यांच्या जाण्याने क्रिकेट जगताने केवळ एक महान खेळाडूच नाही, तर या खेळाचा सर्वात मोठा दूत गमावला आहे.

हेही वाचा
सर्व पहा