कृषी संचालक : पाऊस झाल्याने चिंतेचे कारण नाही

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे भात पिकाचे नुकसान झालेले नाही. मात्र, तरवा काढून लावणी करण्यास सुमारे दहा दिवसांचा विलंब झाला आहे. आता पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने लावणीचे काम वेगाने सुरू करता येईल, अशी माहिती कृषी संचालक चंद्रहास देसाई यांनी दिली.
पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. कृषी खात्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. ज्यांनी तरवा काढून ठेवला होता, त्यांना ती सुकण्याची भीती होती. ज्यांनी तरवा अद्याप काढला नव्हता, त्यांनाही तो खराब होण्याची चिंता होती. आता पाऊस सुरू झाल्याने पुरेसे पाणी मिळणार असून तो तग धरेल. तसेच ज्यांनी तरवा काढून ठेवला आहे, त्यांनाही आता लावणी करता येणार आहे.
केपे, काणकोण आणि सांगे तालुक्यांतील बहुतांश शेती डोंगराळ भागात आहे. या भागात पाऊस न पडल्यास शेतीचे नुकसान होण्याची शक्यता असते. मात्र, गेल्या दोन दिवसांत या भागांत जोरदार पाऊस झाल्याने चिंतेचे कारण राहिलेले नाही.
हवामान खात्याने शनिवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज वर्तविला आहे. मात्र गुरुवारपासूनच पावसाला सुरुवात झाली. मात्र, पेरणी आणि लावणीला झालेल्या विलंबाचा परिणाम पुढील शेतीकामांवर होणार असून त्यामुळे भात पीकही उशिरा तयार होईल.