लावणीसाठी येत्या दोन दिवसांत पाऊस पडणे आवश्यक

अपुऱ्या पावसामुळे ताळगाव परिसरातील वाळलेले भातपीक. (नारायण पिसुर्लेकर)
पणजी : पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्यामुळे पेरणीनंतर बियाणे रुजण्यास विलंब झाला असला, तरी बुधवार आणि गुरुवारी झालेल्या पावसाच्या सरींमुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, रुजलेले बियाणे जिवंत राहण्यासाठी पुढील दोन दिवसांत चांगला पाऊस होणे अत्यावश्यक असल्याची माहिती कृषी संचालक चंद्रहास देसाई यांनी दिली.
केपे, सांगे, धारबांदोडा, पेडणे, वाळपई आणि फोंडा परिसरात झालेल्या पावसामुळे पेरणी केलेल्या बियाण्यांना आधार मिळाला आहे. हवामान खात्याने शनिवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला असून, तसे झाल्यास शेतकऱ्यांची चिंता मोठ्या प्रमाणात कमी होईल.
दरम्यान, वेळसांव वगळता राज्यात अन्यत्र शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नसल्याचे कृषी खात्याने स्पष्ट केले आहे. पाऊस नियमित होईपर्यंत शेतीची पुढील कामे न करण्याचा सल्लाही शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.