Home >> ताज्या बातम्या >> शिक्षण संचालनालयाचे परिपत्रक ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा!

शिक्षण संचालनालयाचे परिपत्रक ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा!

आमदार विजय सरदेसाईंची सरकारवर टीका


30 mins ago
शिक्षण संचालनालयाचे परिपत्रक ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा!

गोवन वार्ता। प्रतिनिधी
पणजी : शाळांमध्ये बाहेरील वक्त्यांना निमंत्रित करण्यापूर्वी शिक्षण संचालनालयाची पूर्वपरवानगी सक्तीची करणारा राज्य सरकारचा नवा आदेश म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि खुल्या शिक्षणावर हल्ला आहे, अशी घणाघाती टीका गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.
सत्ताधारी राज्य सरकारकडून शिक्षण क्षेत्रातही आपले वर्चस्व व नियंत्रण आणण्याचा हा प्रयत्न म्हणजेच अभिव्यक्तीची गळचेपी असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला. सरदेसाई यांनी यासंदर्भात संताप व्यक्त करतानाच समाजमाध्यमावरून राज्य सरकारवर टीका केली. आमदार सरदेसाई म्हणाले की, काही विशिष्ट संस्थांबद्दल, व्यक्तीबद्दल जर राज्य सरकारला आक्षेप किंवा चिंता असेल, तर सरकारने थेट त्यांच्यावर कारवाई करावी; परंतु त्याच्या नावाखाली सरसकट सर्वांवरच निर्बंध लादून इतरांना वेठीस धरू नये, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि खुल्या वातावरणात शिक्षण मिळणे आवश्यक आहे, असे सांगत त्यांनी हे जुलमी परिपत्रक सरकारने तत्काळ मागे घ्यावे, अशी मागणी केली आहे.
प्रत्येक बाहेरील वक्त्यासाठी शिक्षण खात्याची पूर्वपरवानगी बंधनकारक करणे म्हणजे प्रत्येक तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थेला संशयाच्या भोवऱ्यात उभे करण्यासारखे आहे. शिक्षण क्षेत्रात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असते, मात्र अशा नियमांमुळे त्यावर गदा येईल.
_ विजय सरदेसाई, आमदार

हेही वाचा
सर्व पहा