दोघेही बेळगावचे : पोलिसांकडून कसून चौकशी सुरू

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : बार्देश तालुक्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्याच्या घरात चोरीचा प्रयत्न करणार्या दोघा संशयितांना साळगाव पोलिसांनी प्रतिबंधात्मक अटक केली. तोर्डा येथील हायलँडस् व्हिला संकुलातील चोरी प्रकरणी दोघा संशयितांना पर्वरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. पणजीतील कॅसिनोमध्ये जुगार खेळण्याचा बनाव करून ही टोळी आलिशान घरे फोडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ख्वाजा रफिक सयद (३५) व ईद्रीस शेख (१९, दोघे रा. सत्यसाई कॉलनी, वैभवनगर, बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत.
आठ दिवसांपूर्वी साळगाव पोलीस हद्दीतील एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याच्या वडिलोपार्जित घरात चोरीचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील चोरांना पकडण्यासाठी साळगाव पोलिसांनी सापळा रचला होता. संशयित पणजीत आल्याचे समजताच पोलिसांनी चोरांचा माग काढत मंगळवारी पहाटे त्यांना पकडले. झडतीवेळी त्यांच्याकडे घरफोडीसाठी लागणारी हत्यारे सापडली. संशयितांना प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक करण्यात आली. मंगळवारी पाच ते सहा घरे फोडून बेळगावमध्ये पळून जाण्याचा त्यांचा बेत होता; परंतु त्यापूर्वीच ते पोलिसांच्या तावडीत सापडले. मंगळवारी सायंकाळी संशयितांना म्हापसा येथील उपजिल्हाधिकार्यांसमोर हजर करण्यात आले. नंतर पर्वरी पोलिसांनी दोघांनाही वरील चोरी प्रकरणी ताब्यात घेतले.
एका संशयिताचा चोरीत सहभाग स्पष्ट
चौकशीवेळी एकाचा तोर्डा पर्वरी येथील हायलँड्स व्हिला संकुलमधील चोरीत सहभाग असल्याचे आढळून आले. ही चोरी ४ जुलैला पहाटे झाली होती. चार ते पाच जणांच्या टोळीने संकुलातील ७ व्हिला फोडले होते. काही व्हिलांमधील सीसीटीव्ही डीव्हीआर चोरले होते. त्यावेळी चोरांच्या हाती किमती मुद्देमाल लागला नव्हता. पोलिसांना एकाचा वरील चोरीमध्ये सहभाग आढळून आला असून दुसर्यांचीही कसून चौकशी सुरू आहे.