Home >> गोवा >> होमस्टे नोंदणीत गोवा देशात आदर्श राज्य

होमस्टे नोंदणीत गोवा देशात आदर्श राज्य

कमी कागदपत्रे, जलद मंजुरी आणि पर्यटनपूरक धोरण : नीती आयोगाचे निरीक्षण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14 mins ago
होमस्टे नोंदणीत गोवा देशात आदर्श राज्य

पणजी : होमस्टे (homestay) व्यवसायाला चालना देण्यासाठी सोपी नोंदणी प्रक्रिया, कमी कागदपत्रांची आवश्यकता आणि 'एकखिडकी मंजुरी' व्यवस्थेसाठी गोवा देशात आदर्श राज्य (Goa number one in India) म्हणून समोर आले आहे. इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात लहान पर्यटन उद्योजकांना होमस्टे सुरू करणे आणि त्याची नोंदणी करणे कमी नोकरशाही व कमी अडथळ्यांचे आहे, अशी माहिती नीती आयोगाच्या अहवालातून समोर आली आहे.

नीती आयोगाने 'रिथिंकिंग होमस्टेज' या अहवालात गोवा, केरळ, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांच्या होमस्टे नियमांचा तुलनात्मक अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे.

या अभ्यासानुसार, इतर राज्यांप्रमाणे परवानगी मिळण्यापूर्वी तपासण्या आणि विविध खात्यांच्या मंजुऱ्या पूर्ण होण्याची वाट पाहण्याची आवश्यकता गोव्यात नाही. गोवा पर्यटन खाते आधी नोंदणी प्रमाणपत्र जारी करते आणि त्यानंतर संबंधित खात्यांकडून तपासणी व 'ना हरकत प्रमाणपत्र' मिळवण्याची प्रक्रिया स्वतः हाताळते. ही व्यवस्था प्रभावीपणे 'एकखिडकी मंजुरी' व्यवस्था म्हणून काम करते, ज्यामुळे अर्जदारांना सरकारी कार्यालयांचे फेरे मारावे लागत नाहीत.

गोव्यात अर्जासाठी सर्वात कमी कागदपत्रे
अभ्यासात समाविष्ट असलेल्या सर्व राज्यांच्या तुलनेत गोव्यात अर्जासाठी सर्वात कमी कागदपत्रांची गरज भासते. अर्जदारांना फक्त मालकी हक्काचा पुरावा, ओळखपत्र आणि लागू असल्यास जीएसटी नोंदणी सादर करावी लागते. याउलट, उत्तर प्रदेशच्या 'पेईंग गेस्ट' योजनेत सर्वांत जास्त कागदपत्रांची मागणी केली जाते आणि ही देशातील सर्वांत कटकटीच्या नोंदणी प्रक्रियेपैकी एक मानली जाते, असे अहवालात म्हटले आहे.

नोंदणी शुल्क अवघे १,००० रुपये

गोव्यात नोंदणी आणि नूतनीकरण या दोन्ही प्रक्रिया एकाच ऑनलाईन पोर्टलद्वारे होतात. नोंदणी पाच वर्षांसाठी वैध असते आणि नूतनीकरण करताना नव्याने कागदपत्रे सादर करावी लागत नाहीत. यामुळे व्यावसायिकांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचतो. 'गोवा होमस्टे आणि बेड अँड ब्रेकफास्ट' धोरणांतर्गत नोंदणी शुल्क अवघे १,००० रुपये ठेवण्यात आले आहे, असे अहवालात नमूद केले आहे.

एका वर्षानंतर अर्ज शुल्काची परतफेड

अर्ज प्रक्रिया सोपी करण्यासोबतच सरकारने गोव्याच्या ग्रामीण भागात होमस्टे व्यवसायाला चालना देण्यासाठी योजना सुरू केल्या आहेत. पात्र होमस्टे मालकांना पहिल्या १०० नोंदणीकृत होमस्टेसाठी एका वर्षानंतर अर्ज शुल्काची परतफेड (रिफंड) मिळते. तसेच, सरकारमान्य विक्रेत्यांकडून फर्निचर खरेदी केल्यास २ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्याची व्यवस्था आहे आणि असे अर्ज एका वर्षाच्या आत निकाली काढले जातात.

होमस्टे चालकांसाठी नियमित प्रशिक्षण

गोव्याच्या पर्यटन खात्याने विविध ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सींसोबत भागीदारी करून ग्रामीण आणि शहरी भागांतील होमस्टे चालकांसाठी नियमित प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत. या प्रशिक्षणातून सेवेची गुणवत्ता, आदरातिथ्य व्यवस्थापन आणि डिजिटल माध्यमातून होमस्टेची प्रसिद्धी वाढवण्यास मदत मिळते.

हेही वाचा
सर्व पहा