Home >> गोवा >> गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण ३२ टक्क्यांनी कमी

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण ३२ टक्क्यांनी कमी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
40 mins ago
गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण ३२ टक्क्यांनी कमी

पणजी : अनुकूल वातावरण नसल्याने राज्यातील मान्सून कमजोर झाला आहे. जुलै महिना असूनही राज्यात कडक ऊन पडत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात पावसाचे प्रमाण ३१.८० टक्क्यांनी कमी आहे. राज्यात १ जून ते १४ जुलै २०२५ मध्ये ५२.४० इंच पावसाची नोंद झाली होती. यंदा याच कालावधीत  ३५.७४ इंच पावसाची नोंद झाली आहे. तुलनेने अधिक पाऊस पडणाऱ्या धारबांदोडा, सांगे, सत्तरी आणि काणकोण तालुक्यात देखील यंदा गतवर्षी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

गतवर्षी १ जून ते १४ जुलै दरम्यान काणकोण तालुक्यात ५०.३३ इंच पावसाची नोंद झाली होती. यंदा या कालावधीत काणकोणमध्ये ४९.७८ इंच पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी वरील कालावधीत सांगे तालुक्यात ६८.०६ इंच पावसाची नोंद झाली होती. यंदा सांगे तालुक्यात ४०.७७ इंच पाऊस पडला आहे. धारबांदोडामध्ये गतवर्षी ७९.०३ इंच पाऊस पडला होता. यंदा तेथे ४३.५५ इंच पाऊस पडला आहे.

सत्तरी तालुक्यातील वाळपई केंद्रात गतवर्षी ६४.२७ इंच पाऊस पडला होता. यंदा तेथे ३८.३६ इंच पाऊस पडला आहे. 

मंगळवारी राज्यात कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम होती. बहुतेक ठिकाणी कडक ऊन पडले होते. पणजीत कमाल ३३.५ अंश तर किमान २७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमधील कमाल तापमान ३३ अंश व किमान तापमान २७.४ अंश सेल्सिअस राहिले. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३३ ते ३४ अंश व किमान तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने राज्यात १५ ते २० जुलै दरम्यान तुरळक पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.





हेही वाचा
सर्व पहा