विजेच्या धक्क्याने झाला होता मृत्यू

डिचोली : डिचोली तालुक्यातील एका घरात सुरू असलेल्या विद्युत कामादरम्यान विजेचा धक्का लागून आयटीआयचा विद्यार्थी अक्षत नाईक (ITI student death) मृत्यू पावला होता. याप्रकरणी डिचोली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यात केदार मांद्रेकर (वीज खात्याचा लाईनमन) व घर मालक समीर मावळींगकर यांचा समावेश आहे.
मृत अक्षत राजेश नाईक (वय २०) हा आयटीआयमध्ये इलेक्ट्रिकल शाखेचे शिक्षण घेत होता. प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा या उद्देशाने विद्युत कामात मदत करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केदार कृष्णा मांद्रेकर (वय ३३) हा नव्याने बांधण्यात आलेल्या पहिल्या मजल्यावरील घरातील विद्युत जोडणीचे काम करत होता. हे घर समीर रामनाथ मावळींगकर (वय ४१) यांचे आहे.
कामा दरम्यान पहिल्या मजल्यावर अधिकृत वीज जोडणी नसताना तात्पुरत्या स्वरूपात तळमजल्यावरील वीजपुरवठ्याद्वारे नव्याने बसविण्यात आलेल्या वायरिंगची चाचणी घेण्यात आली. याच वेळी अक्षतला जोरदार वीजेचा धक्का बसून तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने डिचोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
शवचिकीत्सा अहवालानुसार, वीजेचा धक्का बसल्यामुळे झालेल्या फुफ्फुस व मेंदूतील सूजेमुळे अक्षतचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीत केदार मांद्रेकर यांनी अक्षतला कामासाठी मदतीस घेतल्याचे तसेच आवश्यक सुरक्षा उपाय न करता विद्युत चाचणी घेतल्याचे निष्पन्न झाले. घरमालक समीर मावळींगकर यांनीही पुरेशी सुरक्षेची खबरदारी सुनिश्चित न करता हे धोकादायक काम करण्यास परवानगी दिल्याचे समोर आले.
या निष्काळजीपणामुळे अक्षतचा मृत्यू झाल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी (Bicholim Police) दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १०६(१) सह कलम ३(५) अंतर्गत डिचोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. सोमवारी दोघांनाही अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.