म्हापसा पालिका अधिकार्यांचा वेळकाढूपणा : उद्यानातील कचऱ्याची समस्या गंभीर

कुचेली, म्हापसा कचरा प्लांटमध्ये बसवलेले श्रेडर वूड मशीन.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : पालिकेने उद्यानाच्या कचर्याची (गार्डन वेस्ट) विल्हेवाट लावण्यासाठी दहा लाख रुपये खर्चून खरेदी केलेल्या आणि दीड वर्ष धूळखात पडून असलेल्या श्रेडर (चिपर) मशिनला वीजजोडणी देण्यासाठी निविदा जारी केली आहे. कुचेली कचरा प्लांटमध्ये पडून असलेले हे मशीन लवकरच कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
म्हापसा नगरपालिकेला काही वर्षांपासून गार्डन वेस्टची गंभीर समस्या भेडसावत आहे. माडाची झावळे, झाडांच्या तोडलेल्या फांद्या, केळी, तसेच पालापाचोळा हा कचरा रहिवासी घराच्या कुंपणाबाहेर रस्त्याकडेला टाकून देतात. शिवाय नगरपालिका उद्यानातून निर्माण होणार्या कचर्याचा भारही पालिकेवर होता. या कचऱ्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत होता. तसेच शहराला बकाल स्वरूप आले आहे. हा कचरा पूर्वी आसगाव पठारावरील कचरास्थळी टाकला जात होता. कामुनिदादने हरकत घेतल्यामुळे या जागेवर कचरा टाकण्यास मनाई करण्यात आली. नंतर हा कचरा साळगाव येथील प्रकल्पामध्ये पाठवला जायचा. पण तिथे सर्वच कचरा घेतला जात नव्हता. दररोज दोन ते तीन ट्रकभर निर्माण होणार्या बागेतील कचर्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न पालिकेसमोर होता.
गार्डन वेस्टची गंभीर बनलेली समस्या सोडवण्यासाठी पालिकेने दीड वर्षापूर्वी सुमारे १० लाख रुपये खर्चून वूड चिपर (श्रेडर) मशीन खरेदी केले. या मशिनची व्यवस्था कुचेली कचरा विल्हेवाट प्लांटमध्ये करण्यात आली आहे. मात्र या मशीनला उच्च दाबाच्या वीज पुरवठ्याची गरज होती. कचरा प्लांटच्या आवारातील वीज ट्रान्फॉर्मर ते श्रेडर मशीनपर्यंत भूमिगत वीजवाहिनी टाकून वीज जोडणी देणे पालिकेला शक्य झाले नसल्याने दीड वर्ष मशीन बंदावस्थेत होते.
तत्कालीन पालिका मंडळाने मशीन लवकर कार्यान्वित केले जावे, कारण बागेच्या कचर्याची समस्या गंभीर होत चालल्याचे अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले होते; परंतु वीज वाहिनीच्या अंदाजपत्रकाचे काम सुरू असल्याचे सांगून अधिकारीवर्ग याकडे दुर्लक्ष करत होता. सध्या पालिकेवर सरकारने प्रशासक नियुक्त केल्यामुळे अधिकार्यांनी आवश्यक पाठपुरवठा करून श्रेडर मशीनला वीजपुरवठा देण्यासाठी भूमिगत वीजवाहिनी टाकण्यासाठी निविदा जारी केली आहे.
दररोज सुमारे ३ ते ४ टन कचर्यावर प्रक्रिया
पालिकेच्या एका अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अखेरीस सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर श्रेडर मशिनच्या वीज पुरवठ्याची समस्या सोडवण्यात आली आहे. या जागी शेड उभारणीचे कामही जवळपास पूर्ण झाले असून ते पूर्ण होताच लवकरच मशीनची चाचणी केली जाईल. हे मशीन कार्यान्वित झाल्यामुळे दररोज सुमारे ३ ते ४ टन कचर्यावर प्रक्रिया होईल.