रुग्णवाहिका पोहोचण्यास पाऊण तास विलंब; जखमींवर गोमेकॉमध्ये उपचार

पणजी : खोर्ली क्रॉस परिसरात सोमवारी पहाटे सुमारे ५.४५ वाजण्याच्या सुमारास भटक्या गुरांना दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात एक दांपत्य जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीची मदत मिळण्यात विलंब झाल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दांपत्य दुचाकीवरून प्रवास करीत असताना अचानक रस्त्यावर आलेल्या भटक्या गुरांना त्यांची दुचाकी धडकली. धडक इतकी जोरदार होती की दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल पाऊण तास लागल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जखमींना वेळेवर वैद्यकीय मदत मिळण्यात अडथळा निर्माण झाला.
यानंतर जखमी दांपत्याला तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (गोमेकॉ) (Goa medical college Hospital GMC) दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
भटक्या गुरांमुळे अपघातांत भर
दरम्यान, रस्त्यांवर मुक्त संचार करणाऱ्या भटक्या गुरांमुळे अपघातांच्या घटना वाढत असल्याने या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.