Home >> गोवा >> मडगावात न्यू मार्केटनजीकच्या 'मान्यवर' शोरूमला आग; लाखोंचे नुकसान

मडगावात न्यू मार्केटनजीकच्या 'मान्यवर' शोरूमला आग; लाखोंचे नुकसान

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
5 mins ago
मडगावात न्यू मार्केटनजीकच्या 'मान्यवर' शोरूमला आग; लाखोंचे नुकसान

मडगाव : येथील न्यू मार्केटनजीक असलेल्या प्रसिद्ध 'मान्यवर' कपड्यांच्या शोरूमला रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत दुकानातील महागड्या कपड्यांसह इतर साहित्याचे लाखोंचे नुकसान झाले असून, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, अशी शक्यता अग्निशामक दलाने वर्तवली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मडगाव येथील लिली गारमेंटच्या मागील बाजूला असलेल्या 'मान्यवर' या ब्रँडेड कपड्यांच्या दुकानाला रविवारी अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच मडगाव अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आग शोरूमच्या पहिल्या मजल्यावर लागली होती, जिथे कपड्यांचा मोठा साठा (गोदाम) करून ठेवण्यात आला होता. पहिल्या मजल्यावर धुराचे साम्राज्य पसरल्यामुळे जवानांना सुरुवातीला काहीही दिसत नव्हते.



अग्निशामक दलाच्या जवानांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्वप्रथम दुकानाचा वीज पुरवठा खंडित केला आणि त्यानंतर आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. शोरूमच्या तळमजल्यावर कपड्यांची विक्री सुरू होती, तर पहिल्या मजल्यावर साठा होता. आग लागल्याचे समजताच शोरूममधील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून दुकानातील जास्तीत जास्त कपडे सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.



तथापि, आग आणि त्यानंतर करण्यात आलेल्या पाण्याच्या मारामुळे शोरूममधील अनेक महागडे कपडे खराब झाले असून काही कपडे जळून खाक झाले आहेत. याशिवाय दुकानाच्या अंतर्गत फर्निचर आणि इतर साहित्याचेही प्रचंड नुकसान झाले आहे. आगीमुळे झालेल्या एकूण नुकसानीचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नसला, तरी हा आकडा लाखोंच्या घरात असण्याची शक्यता आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच दाखवलेल्या तत्परतेमुळे आग अधिक पसरण्यापासून रोखण्यात यश आले.


हेही वाचा
सर्व पहा