सामान्य प्रवासी बनून परिवहन मंत्र्यांनी २ तासांत केला १० बसमधून प्रवास. केली व्यवस्थेची पाहणी; बंगळुरूच्या मुजोर बस कर्मचाऱ्यांचा गेम ओव्हर! अनेकांना केले तत्काळ निलंबित.

बंगळुरू: कर्नाटकचे परिवहन मंत्री बैरती सुरेश यांनी शनिवारी रात्री बंगळुरूमध्ये एक सामान्य प्रवासी बनून 'बीएमटीसी' (BMTC) बस सेवेची अचानक पाहणी केली. त्यांनी ओळख पटू नये म्हणून तोंडाला मास्क लावला होता आणि दोन तासांत १० हून अधिक बसेसमधून प्रवास केला. ही घटना ऐकून हा सीन कुणालाही अनिल कपूरचा नायक चित्रपट आठवेल.
परिवहन मंत्री सुरेश आपल्याच बसमध्ये प्रवास करत आहेत, याची साधी कल्पनाही इतर प्रवाशांना किंवा बस कर्मचाऱ्यांना आली नाही. त्यांनी रात्री ७:१० ते ९:१० या वेळेत जयमहाल, टीव्ही टॉवर, आर. टी. नगर, सीबीआय रोड, बेल्लारी रोड, हेब्बाळ, भूपसंद्र, मान्यता टेक पार्क, नागवारा, हेन्नूर आणि गदलाहल्ली अशा विविध मार्गांवरून प्रवास करत बस सेवांचा दर्जा आणि कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. प्रत्येक बसमध्ये त्यांनी रीतसर तिकीट काढले आणि सहप्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन
या पाहणी दरम्यान, जयमहाल येथून जाणाऱ्या एका बीएमटीसी बसच्या चालकाने, प्रवाशाने हात दाखवूनही 'फन वर्ल्ड' बस स्थानकावर बस थांबवली नाही. दुसऱ्या बसमधून हा प्रकार स्वतः पाहिल्यानंतर मंत्री बैरती सुरेश यांनी संबंधित चालक मुश्ताक आणि वाहक (कंडक्टर) दयानंद यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
रिक्षा चालकाची मुजोरी आणि सुट्या पैशांवरून वाद
या दौऱ्यात मंत्र्यांनी नागाशेट्टीहल्ली येथून साधारण एक किलोमीटरचा प्रवास रिक्षामधून केला. रिक्षाच्या मीटरवर ३० रुपये भाडे झाले असताना चालकाने ३६ रुपयांची मागणी केली. विचारणा केली असता, मीटर नंतर दुरुस्त करून घेऊ असे चालकाने सांगितले. मंत्र्यांनी शेवटी त्याला ४० रुपये दिले आणि ते उतरले.
दुसऱ्या एका घटनेत, हेब्बाळवरून नागाशेट्टीहल्लीकडे जाणाऱ्या बसमध्ये मंत्री चढले आणि त्यांनी १०० रुपयांची नोट देऊन दोन तिकिटे मागितली. त्यावर वाहकाने सुट्या पैशांची मागणी केली. मंत्र्यांनी सुटे पैसे नसल्याचे सांगताच, वाहकाने आपली कॅश बॅग दाखवत माझ्याकडेही सुटे पैसे नाहीत, पैसे नसतील तर बसमधून उतरा, असे सुनावले. यावर कोणताही वाद न घालता किंवा आपली ओळख न दाखवता मंत्री शांतपणे बसमधून खाली उतरले. एक सामान्य प्रवासी म्हणून प्रवास करताना लोकांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, हे जाणून घेण्यासाठीच ही अचानक पाहणी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.