चोरी प्रकरणानंतर देणगी पेटीत ५०० ऐवजी १०-२० रुपयांच्या नोटांत वाढ

लखनऊ: अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देणगी मोजणी विभागातील २३ कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी एकाच वेळी राजीनामे दिल्याने मंदिर प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. (In a major development, 23 employees responsible for counting donation money at Shree Ram Mandir in Ayodhya resigned) . देणगी चोरी प्रकरणानंतर मोजणी प्रक्रियेत झालेल्या बदलांमुळे कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे.
माहितीनुसार, पूर्वी देणगीत मोठ्या मूल्याच्या नोटांचे प्रमाण अधिक असल्याने मोजणीचे काम तुलनेने लवकर पूर्ण होत असे. मात्र, सध्या ₹१० आणि ₹२०च्या नोटांचे प्रमाण वाढल्याने मोजणीसाठी अधिक वेळ लागत असून प्रक्रिया अधिक किचकट झाली आहे. याशिवाय, पूर्वी दोन शिफ्टमध्ये सुरू असलेले काम आता सकाळी ९ ते सायंकाळी ६ अशा एकाच शिफ्टमध्ये करण्यात येत आहे.
कामाचे तास वाढविण्यात आले असले तरी वेतनात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. अखेर २३ कर्मचाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. या राजीनाम्यांनंतर आता देणगी मोजणीसाठी भारतीय स्टेट बँकेकडून नियुक्त केवळ १३ कर्मचारी शिल्लक राहिले आहेत.
दरम्यान, देणगी चोरी प्रकरणाच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी शुक्रवारी अयोध्येला भेट देऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. मंदिर परिसरातील बांधकामाची पाहणी केली. ७ जूननंतर या प्रकरणामुळे त्यांनी केलेली ही तिसरी अयोध्या भेट आहे.
१३ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
दरम्यान, राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी दाखल याचिकांवर १३ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सीबीआय चौकशी, विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्ती आणि देणगी व्यवस्थापनाचा तज्ज्ञ समितीकडून आढावा घेण्याची मागणी याचिकांमध्ये करण्यात आली आहे.