Home >> गोवा >> गोवा विद्यापीठातील मेसमध्ये दर्जेदार, पौष्टिक अन्न मिळणे हा विद्यार्थ्यांचा हक्क!

गोवा विद्यापीठातील मेसमध्ये दर्जेदार, पौष्टिक अन्न मिळणे हा विद्यार्थ्यांचा हक्क!

जेवणात अळ्या, किडे, झुरळाचे तुकडे आढळणे संतापजनक

Story: गोवन वार्ता । सुदीप राजेंद्र नाईक |
20 mins ago
गोवा विद्यापीठातील मेसमध्ये दर्जेदार, पौष्टिक अन्न मिळणे हा विद्यार्थ्यांचा हक्क!

पणजी : गोवा विद्यापीठाच्या वसतिगृहातील मेसमध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या, किडे तसेच झुरळाचे तुकडे आढळल्याच्या अलीकडील घटना अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आहेत. विद्यापीठात शिक्षणासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच इतर राज्यांतून विद्यार्थी येतात. त्यांच्यासाठी वसतिगृह हे केवळ राहण्याचे ठिकाण नसून दुसरे घर असते आणि मेसमधील अन्न ही त्यांची मूलभूत गरज असते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या ताटात पौष्टिक आणि स्वच्छ अन्नाऐवजी अशा प्रकारचे घृणास्पद प्रकार आढळणे, हे कोणत्याही सुजाण समाजासाठी लाजिरवाणे आहे.
दुर्दैवाची बाब म्हणजे हा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. यापूर्वीही गोवा विद्यापीठाच्या मेसबाबत विद्यार्थ्यांकडून स्वच्छता, अन्नाचा दर्जा आणि व्यवस्थापनाविषयी तक्रारी झालेल्या आहेत. त्यामुळे ही एखादी अपवादात्मक घटना नसून व्यवस्थेतील सातत्याने दुर्लक्षित राहिलेल्या त्रुटींचे हे गंभीर उदाहरण आहे.
गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळ महासचिव म्हणून कार्य करत असताना २०२४ साली अशाच प्रकारच्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. त्या वेळी केवळ निवेदने देऊन किंवा निषेध नोंदवून आम्ही थांबलो नाही. संबंधित अधिकाऱ्यांसोबत मेसची प्रत्यक्ष पाहणी केली. त्या पाहणीत स्वच्छतेसंदर्भातील अनेक त्रुटी निदर्शनास आल्या. स्वयंपाकघरातील स्वच्छता, अन्न हाताळण्याची पद्धत, एकूण देखभाल, तसेच एक्झॉस्ट आणि वायुवीजन व्यवस्थेतील उणिवा स्पष्टपणे समोर आल्या. त्या वेळी या सर्व बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणून आवश्यक सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली होती. काही सुधारणा झाल्या देखील; मात्र आज पुन्हा अशाच प्रकारच्या घटना घडत असतील, तर त्या सुधारणा सातत्याने टिकवून ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसून येते.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित विषयांमध्ये कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. विद्यापीठाची गुणवत्ता केवळ अभ्यासक्रम, परीक्षा किंवा संशोधनावर मोजली जात नाही; तर विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानपूर्वक वातावरण उपलब्ध करून देण्यावरही ती अवलंबून असते. मेसमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नाची गुणवत्ता ही त्यातील सर्वात महत्त्वाची बाब आहे.
या संपूर्ण प्रकरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हा विषय तातडीने विद्यापीठ प्रशासनासमोर मांडला आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. विशेषतः विद्यापीठ परिसरातील कार्यकर्ता अंशुल सिनारी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देत हा विषय सातत्याने लावून धरला आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच्या प्रश्नांवर कोणतीही विद्यार्थी संघटना अशीच सकारात्मक आणि जबाबदारीची भूमिका घेत असेल, तर त्याचे स्वागतच झाले पाहिजे.
आता गरज आहे ती दोषारोपांच्या राजकारणाची नव्हे, तर कायमस्वरूपी उपाययोजनांची. मेसची नियमित आणि अचानक तपासणी, स्वच्छतेच्या निकषांचे काटेकोर पालन, अन्नसुरक्षेचे वेळोवेळी लेखापरीक्षण, कीटकनाशक फवारणीचे नियमित नियोजन, स्वयंपाकघरातील वायुवीजन आणि स्वच्छतेची योग्य व्यवस्था, अन्नसाठ्याची शास्त्रीय पद्धतीने देखभाल, तसेच विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर त्वरित कारवाई करणारी पारदर्शक यंत्रणा उभारणे ही आता काळाची गरज आहे. केवळ घटना घडल्यानंतर चौकशी समित्या नेमण्यापेक्षा अशा घटना घडणारच नाहीत, अशी व्यवस्था उभारणे हेच खरे प्रशासनाचे यश ठरेल.
योग्य अन्न मिळणे विद्यार्थ्यांचा अधिकार
गोवा विद्यापीठ ही राज्यातील सर्वोच्च शिक्षणसंस्था आहे. त्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण अन्न मिळणे हा त्याचा अधिकार आहे, उपकार नव्हेत. प्रत्येक पालक आपल्या मुलाला मोठ्या विश्वासाने विद्यापीठात पाठवतो. त्या विश्वासाला तडा जाऊ नये, ही जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत तातडीने कठोर आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या ताटात पुन्हा कधीही अन्नाऐवजी निष्काळजीपणा वाढून येऊ नये, हीच या लेखामागची भूमिका आहे.      

हेही वाचा
सर्व पहा