ईडीकडून २७.१० कोटींची मालमत्ता तात्पुरती जप्त

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) करंझाळे येथील २,४७५ चौ.मीटर जमीन हडप निगडित मनी लाँड्रिंग प्रकरणी आर्चडिओसीज ऑफ गोवाचे फा. आर्लिनो डिमेलो, फा. व्हिक्टर राॅड्रिग्ज, प्रभाकर हवालदार यांच्यासह माॅडेल्स कन्स्ट्रक्शन कंपनीविरोधात मेरशी येथील विशेष (पीएमएलए) न्यायालयात २,७४६ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. दरम्यान, या प्रकरणी ईडीने २७.१० कोटींची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.
दत्ताराम तनू गावस उर्फ काणकोणकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पणजी पोलिसांनी १८ जानेवारी २०१० रोजी गुन्हा दाखल केला. तक्रारीत म्हटले आहे की, पणजी शहर चलता क्रमांक ४४ पीटी शीट क्रमांक १६२ मधील २,४७५ चौ.मी. जमिनीत तक्रारदाराचे वडील कूळ म्हणून नोंद होते. १८ नोव्हेंबर २००४ ते ५ डिसेंबर २००६ या कालावधीत आर्चडिओसीज ऑफ गोवाचे फा. आर्लिनो डिमेलो आणि फा. व्हिक्टर राॅड्रिग्ज यांनी पणजी शहर सर्व्हेमध्ये आर्चडिओसीज ऑफ गोवा नावाची नोंद करण्याचा अर्ज सादर केला. तत्कालीन सर्व्हे संचालनालयाचे निरीक्षक प्रभाकर हवालदार यांनी ५ डिसेंबर २००६ रोजी निवाडा देऊन आर्चडिओसीज ऑफ गोवा नावाची नोंद केली. ९ एप्रिल २००७ रोजी वरील जमीन मॉडेल्स कन्स्ट्रक्शन्सचे भागीदार पीटर वाझ यांनी खरेदी करून ‘मॉडेल्स मिस्टिक’ रहिवासी प्रकल्प हाती घेतला. पोलिसांनी १८ जानेवारी २०१० रोजी संशयित म्हणून फा. डिमेलो, फा. राॅड्रिग्ज आणि हवालदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
ईडीची कारवाई
ईडीने मॉडेल्स कन्स्ट्रक्शन्सचे मालक डायगो वाझ आणि नातालीना वाझ यांची चौकशी करून १६ डिसेंबर २०२५ रोजी करंझाळे येथील घरासह सांतिनेझ येथील कार्यालयावर छापा टाकला. ईडीने मॉडेल्सने दुबईत गुंतवणूक केलेल्या आणि ‘मॉडेल्स मिस्टिक’ प्रकल्पाच्या दुकाने आणि फ्लॅटचे विक्री दस्तावेज जप्त केले.
पीटर वाझ यांचे निधन झाल्यामुळे आर्चडिओसीज ऑफ गोवाचे तसेच फा. डिमेलो आणि फा. राॅड्रिग्ज यांच्यासह तत्कालीन सर्व्हे संचालनालयाचे निरीक्षक हवालदार यांची चौकशी केली.
चौकशीत संशयितांनी ९ एप्रिल २००७ रोजी बनावट दस्तावेजद्वारे विक्री करार केल्याचे समोर आले. ईडीने वरील प्रकल्पाची २७.१० कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली.
ईडीने फा. डिमेलो, फा. राॅड्रिग्ज, हवालदार यांच्यासह माॅडेल्स कन्स्ट्रक्शन कंपनीविरोधात मेरशी येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.