लैंगिक अत्याचार प्रकरण; तरुण तेजपाल यांना शरण येण्यासाठी मुदत देण्यास नकार

लैंगिक अत्याचार प्रकरणात १० लाख २१ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा झालेल्या तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना शरण येण्यासाठी मुदत देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
11 mins ago
लैंगिक अत्याचार प्रकरण; तरुण तेजपाल यांना शरण येण्यासाठी मुदत देण्यास नकार

पणजी : लैंगिक अत्याचार प्रकरणात गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने सुनावलेल्या १० वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला आव्हान देणारे 'तहलका'चे माजी संपादक तरुण तेजपाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. न्यायालयात शरण येण्यासाठी मुभा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. तेजपाल यांनी दाखल केलेला यासंदर्भातील अर्ज फेटाळून लावला.

सोमवारी, २४ ऑगस्ट २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयात तरुण तेजपाल याला शरण न येण्याच्या अर्जावर सुनावणी पार पडली होती. गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने तेजपाल यांना १० वर्षांचा कारावास आणि १० लाख २१ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा देत शरण येण्याचा निर्देश दिला होते. या निर्देशाला आव्हान देत तेजपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र न्यायालयाने ही विनंती अमान्य केली.

हे संपूर्ण प्रकरण गोव्यात ७ आणि ८ नोव्हेंबर २०१३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या 'थिंक फेस्ट' या सोहळ्यादरम्यान घडले होते. या सोहळ्यादरम्यान एका आलिशान हॉटेलच्या लिफ्टमध्ये तरुण तेजपाल यांनी आपल्याच एका सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणाच्या दीर्घ सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने त्याला दोषी ठरवून वरील शिक्षा दिली होती. तसेच शरण येण्यास ४ आठवड्याची मुदत दिली होती.

सर्वोच्च न्यायालयाने अर्ज फेटाळल्यामुळे आता तरुण तेजपालला नियमानुसार शरण यावे लागणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा