मांड्या : कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण येथील आरती उक्कड मंदिरात १२ ऑगस्ट रोजी घडलेल्या वादाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओत आमदाराची मुलगी पोलिसांशी दादागिरी करताना दिसत आहे. त्याचबरोबर महिला उपनिरीक्षकाच्या कानशिलात लगावताना दिसत आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तुमकूर ग्रामीण मतदारसंघाचे भाजपचे आमदार बी. सुरेश गौडा यांची मुलगी ऐश्वर्या आणि महिला पोलीस उपनिरीक्षक सविता बी. पाटील यांच्यात मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या यांनी महिला उपनिरीक्षक सविता पाटील यांच्या कानशिलात लगावल्याचे दिसत आहे. त्यानंतर महिला उपनिरीक्षकानेही आमदाराच्या मुलीला थप्पड लगावल्याचे व्हिडीओत दिसत आहे. त्यामुळे मंदिर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला आणि त्यानंतर काय कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.


