‘डिजिटल अरेस्ट’द्वारे लुबाडणाऱ्या दोघांना मुंबईतून अटक

‘ईडी’ची कारवाई : सासष्टीतील महिलेला घातला होता २.६० कोटींचा गंडा


28 mins ago
‘डिजिटल अरेस्ट’द्वारे लुबाडणाऱ्या दोघांना मुंबईतून अटक

गोवन वार्ता प्र‌तिनिधी
पणजी : डिजिटल अरेस्टद्वारे सासष्टी तालुक्यातील एका महिलेची २.६० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईतून फहीम सय्यद व नईम सय्यद या मुख्य सूत्रधारांना अटक केली आहे. त्यांना म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने पाच दिवसांची ईडीची कोठडी ठोठावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सुमारे ३० हजार कोटींच्या देशव्यापी सायबर महाघोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे.
गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने ९ जून २०२५ रोजी सासष्टीतील एका महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, संशयितांनी तक्रारदार महिलेला २० मे २०२५ रोजी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) अधिकारी असल्याचे सांगून तिची आणि तिच्या पतीची डिजिटल अरेस्टद्वारे २ कोटी ६० लाख ३३ हजार ६३४ रुपयांची फसवणूक केली होती. त्यात जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांंनी तक्रारदार महिलेच्या नावाने मुंबईत कॅनेरा बँकेत खाते उघडून त्यात ६ कोटी रुपये जमा केल्याचे सांगितले. सदर रक्कम मनी लाँड्रिंगशी संबंधित असल्याचे सांगून दोघांवर ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे दबाव टाकण्यात आला होता.
ईडीने या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा संशय व्यक्त करून चौकशी सुरू केली. ईडीने १७ जुलै रोजी गोव्यात दोन ठिकाणांसह दिल्ली, मुंबई आणि कोलकता येथे मिळून २० ठिकाणी छापे टाकले. यावेळी ८० लाख रुपयांची रोख रक्कम, १.२४ कोटींचे विदेशी चलन, १.३१ कोटी रुपये किमतीचे सोने, १४ कोटी रुपये किमतीची मालमत्ता, सुमारे १०० विविध बनावट कंपनीचे रब्बर स्टॅम्प जप्त केले होते. पैसे वळविण्यासाठी वापरलेली ४०० हून अधिक बँक खाती गोठविली आहेत.
ईडीने २१ आॅगस्ट रोजी मुंबई आणि गोव्यात टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल ३.२५ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि आक्षेपार्ह कागदपत्रे, डिजिटल पुरावे जप्त केले. जप्त केलेल्या दस्तावेज व इतर माहितीची तपासणी केली. त्यात सदर सिंडिकेटने तब्बल २७ हजार कोटी रुपयांचे व्यवहार बँकिंग चॅनेलद्वारे, तर सुमारे ३ हजार कोटी रुपयांचे व्यवहार रोखीने केल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, ईडीने २३ रोजी मुंबईत कारवाई करत मुंबईतून फहीम सय्यद व नईम सय्यद या मुख सूत्रधारांना अटक करून गोव्यात आणले. त्या दोघांना म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची ईडीची कोठडी ठोठावली आहे.

हेही वाचा
सर्व पहा