चंदगडमधील पोल्ट्री फार्मवर धाड; १.१३ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, 'डी-कंपनी' कनेक्शन उघड

कोल्हापूरच्या चंदगड येथील पोल्ट्री फार्ममध्ये चालणाऱ्या १.१३ कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्ज कारखान्यावर पुणे टास्क फोर्सने छापा टाकत आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत दाऊद टोळीशी संबंधित धक्कादायक धागेदोरे उघड झाले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
41 mins ago
चंदगडमधील पोल्ट्री फार्मवर धाड; १.१३ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, 'डी-कंपनी' कनेक्शन उघड

कोल्हापूर  : गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरात मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्जचे अवाढव्य जाळे विणणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय संघटित रॅकेटचा पुणे अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने पर्दाफाश केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथील एका दुर्गम ठिकाणी पोल्ट्री फार्ममध्ये गुप्तपणे सुरू असलेल्या ड्रग्ज निर्मितीच्या कारखान्यावर शनिवारी (२२ ऑगस्ट) मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात १ कोटी १३ लाख ५१ हजार ४८० रुपयांचे एमडी ड्रग्ज, अतिघातक कच्चे रसायने आणि अद्ययावत उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. या संपूर्ण ड्रग्ज माफियाचे धागेदोर थेट बेळगाव, मुंबई आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीशी जोडले गेल्याचे निष्पन्न झाल्याने महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील प्रशासकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील नयानगर (मीरा रोड) पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी संशयित आरोपी इरफान सलीम खान याला बेड्या ठोकल्या होत्या. पोलिसी खाक्या दाखवताच इरफानने चंदगडमधील या काळ्या धंद्याचा बनाव उघडा केला. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाला कसलीही शंका येऊ नये म्हणून हाजगोळी येथील पप्पू विठ्ठल मलतवाडकर यांच्या पोल्ट्री फार्मचा वापर केला जात होता. कुक्कुटपालनाच्या आड तौसिफ आणि जाफर या दोन साथीदारांच्या मदतीने इरफान हा ड्रग्जनिर्मितीचा अद्ययावत कारखाना चालवत होता. टास्क फोर्सने घटनास्थळावरून २०८ ग्रॅम तयार एमडी ड्रग्ज आणि मोठ्या प्रमाणात घातक रसायने जप्त केली आहेत.

या आंतरराज्यीय कारवाईत उघडकीस आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या रॅकेटचे थेट दाऊद इब्राहिमच्या 'डी-कंपनी'शी असलेले गडद कनेक्शन होय. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमली पदार्थांची तस्करी करणारा आणि दाऊद टोळीचा हुकमी एक्का मानला जाणारा सलीम डोला (सध्या इस्तंबूलमध्ये अटकेत) याच्या इशाऱ्यावर भारतात ड्रग्ज लॅबचे जाळे उभे करणारा दयानंद ऊर्फ दया मुद्दनार या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दयाने देशभरातील तरुणांना अमली पदार्थ तयार करण्याचे तांत्रिक प्रशिक्षण देऊन विविध राज्यांत गुप्त कारखाने सुरू केले होते. आठ दिवसांपूर्वीच मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दयाचा मृत्यू झाला असला, तरी त्याने पसरवलेल्या या विषारी जाळ्याची पाळेमुळे थेट कोल्हापूरच्या चंदगडपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.

या तपासाची व्याप्ती केवळ एका कारखान्यापुरती मर्यादित नसून, ठाणे पोलिसांनी एप्रिल २०२६ मध्ये फिर्दोस नावाच्या महिलेकडून दीड किलो एमडी जप्त केल्यानंतर या आंतरराज्यीय मोहिमेला सुरुवात झाली होती. या साखळीचा पाठपुरावा करत टास्क फोर्सने उत्तर प्रदेशातील सांडेला, तेलंगणातील जहिराबाद आणि मुंबईतील मालवणी येथील ड्रग्ज निर्मिती केंद्रांचा पर्दाफाश करत आतापर्यंत २० जणांना गजाआड केले आहे. या मोहिमेत आजवर तब्बल २० कोटी रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत. मालवणी येथील तपासादरम्यान निष्पन्न झालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण नेटवर्कला बेळगाव आणि मुंबईतील बड्या फायनान्सर्सकडून कोट्यवधी रुपयांचे अर्थसहाय्य पुरवले जात होते. या आंतरराष्ट्रीय साखळीतील बेळगावचा मुख्य सूत्रधार कोण, याचा शोध घेण्यासाठी टास्क फोर्सची विशेष पथके रवाना झाली असून पुढील तपास अत्यंत वेगाने सुरू आहे.


हेही वाचा
सर्व पहा