गोवन वार्ता। प्रतिनिधी
पणजी : गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही फलोत्पादन महामंडळाकडून चतुर्थीसाठी सवलतीच्या दरात नारळाची विक्री करण्यात येणार आहे. नारळाचे दर सातत्याने वाढत असून बाजारात नारळाचा दर ७० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत आहे.
नारळाच्या वाढत्या दरावर फलोत्पादन महामंडळ लक्ष ठेवून आहे. नारळाचे दर आणखी वाढल्यास महामंडळाकडून सवलतीच्या दरात नारळाची विक्री केली जाईल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रेमेंद्र शेट यांनी दिली. गेल्या वर्षी नारळाचे दर वाढल्यानंतर महामंडळाने ४५ रुपये दराने नारळाची विक्री केली होती. त्यावेळी महामंडळातर्फे सुमारे ७० हजार नारळांची विक्री करण्यात आली होती. यंदाही सवलतीच्या दरात नारळ विक्री करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही, असे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.
सध्या श्रावण महिना सुरू आहे. सण-उत्सवांमुळे बहुतांश हिंदू कुटुंबांमध्ये श्रावणात शाकाहारी जेवण केले जाते. गोड पदार्थ, भाज्या आणि रस्सा यासाठी नारळाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. श्रावणानंतर गणेश चतुर्थीमध्येही बहुतांश हिंदू कुटुंबांमध्ये नारळाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे नारळाची मागणी वाढते. मागणी वाढलेली असतानाच नारळाचे दर वाढल्याने गोमंतकीयांच्या खिशाला कात्री बसते. बाजारात नारळाचा तुटवडा नसला तरी मागणी वाढल्याने दर वाढले आहेत.
गेल्या वर्षी श्रावणात नारळाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे दरात वाढ झाली होती. कर्नाटक तसेच अन्य राज्यांतून नारळ आणून फलोत्पादन महामंडळामार्फत सवलतीच्या दरात त्यांची विक्री करण्यात आली होती.
नारळाच्या वाढत्या दरावर फलोत्पादन महामंडळ लक्ष ठेवून आहे. नारळाचे दर आणखी वाढल्यास महामंडळाकडून सवलतीच्या दरात नारळाची विक्री केली जाईल. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सवलतीच्या दरात नारळ विक्री करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
_ प्रेमेंद्र शेट, अध्यक्ष, फलोत्पादन महामंडळ


