ओंकार' हत्तीचे कडशी-मोपा परिसरात पुनरागमन; हातातोंडाशी आलेल्या पिकांवर संकट, शेतकरी धास्तावले

गोवा-महाराष्ट्र सीमेवरील ‘ओंकार’ हत्तीने अखेर पेडणे तालुक्यातील कडशी-मोपा हद्दीत प्रवेश केल्याने शेतकरी धास्तावले आहेत. गणेशोत्सवाच्या तोंडावर हातातोंडाशी आलेल्या पिकांचे रक्षण करण्यासाठी वनखात्याने कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
7 hours ago
ओंकार' हत्तीचे कडशी-मोपा परिसरात पुनरागमन; हातातोंडाशी आलेल्या पिकांवर संकट, शेतकरी धास्तावले

पेडणे: गोवा आणि महाराष्ट्र राज्यांच्या सीमावर्ती भागात गेल्या काही दिवसांपासून वावरणार्‍या ‘ओंकार’ हत्तीने अखेर गोव्याच्या भौगोलिक हद्दीत प्रवेश केला आहे. पेडणे तालुक्यातील कडशी आणि मोपा या मुख्यत्वे शेतीप्रधान परिसरात हत्ती दाखल झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. गणेशोत्सवाच्या ऐन तोंडावर हातातोंडाशी आलेल्या पिकांवर संकट ओढवल्याने बळीराजा हादरला आहे. हत्तीच्या आगमनाची माहिती मिळताच गोवा वनखात्याची पथके सतर्क झाली असून त्याला पुन्हा जंगलात हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

गेल्या वर्षीही याच 'ओंकार' हत्तीने कडशी, मोपा, तोरसे, उगवे आणि तांबोसे भागात महिनाभर धुमाकूळ घातला होता. नारळ, सुपारी, काजू, केळी तसेच भात पिकांचे मोठे नुकसान करून शेतकऱ्यांना आर्थिक गर्तेत लोटले होते. त्या वेळी गोवा व महाराष्ट्र वनखात्याने संयुक्त मोहीम राबवून त्याला कर्नाटकातील जंगलात रवाना केले होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेतर्डे परिसरात पुन्हा दिसू लागला. वनखाते त्याच्यावर लक्ष ठेवून असतानाच, त्याने वनखात्याचे अंदाज निष्फळ ठरवत गोव्यात प्रवेश केला.

सध्या या भागातील शेती आणि बागायती पिकांची उत्पादकता ऐन बहरात आहे. शेतकऱ्यांनी वर्षभराची अपार मेहनत आणि मोठा निधी खर्च करून पिके फुलवली आहेत. अवघ्या काही दिवसांत हे उत्पन्न हाती येणार असताना हत्तीच्या आक्रमणामुळे काही तासांतच पिकांची नासधूस होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः श्री गणेशोत्सव तोंडावर असल्याने शेतीचे नुकसान झाल्यास सणाचा आनंद तर हिरावला जाईलच, शिवाय शेतकऱ्यांचे कंबरडे मोडेल. त्यामुळे नुकसान झाल्यानंतर तुटपुंजी भरपाई देण्यापेक्षा नुकसान होण्याआधीच प्रशासनाने कडक प्रतिबंधात्मक पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी शेतकरी करत आहेत.

स्थानिक पंच सदस्य दयानंद गवंडी यांनी हत्ती सीमेवर असतानाच शासनाला याबाबत इशारा दिला होता. आता हत्ती प्रत्यक्ष गावात घुसल्याने त्यांच्या इशाऱ्याला पुष्टी मिळाली आहे. हत्तीचा वावर दोन्ही राज्यांच्या सीमेवर असल्याने गोवा आणि महाराष्ट्र वनखात्याने परस्पर समन्वय साधून तातडीने संयुक्त मोहीम आखावी, तसेच सीमावर्ती भागात कायमस्वरूपी कुंपण किंवा शास्त्रीय उपाययोजना करून बळीराजाचे रक्षण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा
सर्व पहा