'भुलेश्वरचा राजा'च्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना; २२ फुटी गणेशमूर्ती कोसळून मंडळाच्या अध्यक्षासह दोघे ठार

दक्षिण मुंबईतील भुलेश्वर येथे ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्तीची आगमन मिरवणूक सुरू असताना २२ फुटी मूर्ती कोसळली. या दुर्दैवी दुर्घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झाला, तर दोन लहान मुलांसह पाचजण जखमी झाले आहेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
'भुलेश्वरचा राजा'च्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना; २२ फुटी गणेशमूर्ती कोसळून मंडळाच्या अध्यक्षासह दोघे ठार

मुंबई: गणेशोत्सवाच्या आगमनाचा उत्साह आणि ढोल-ताशांचा गजर सुरू असतानाच, शनिवारी रात्री दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात एक दुर्दैवी दुर्घटना घडली. 'भुलेश्वरचा राजा' सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या २२ फुटी गणेशमूर्तीची आगमन मिरवणूक अंतिम टप्प्यात असताना अचानक घडलेल्या दुर्घटनेत मंडळाच्या अध्यक्षासह अन्य एका भविकाचा मृत्यू झाला, तर दोन लहान मुलांसह पाचजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, भायखळा येथून निघालेली ही आगमन मिरवणूक रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास भुलेश्वर येथील बलराम मर्चंट रोडवरील कबूतरखान्याजवळील जय अंबे चौकात पोहोचली होती. मंडपापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर ही मिरवणूक आली असताना अचानक समतोल बिघडल्याने भव्य गणेशमूर्ती भाविकांच्या अंगावर कोसळली. क्षणात आनंदाचे वातावरण अत्यंत गंभीर बनले आणि अनेक भाविक मूर्तीखाली दाबले गेले.

घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिक, अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. उपस्थितांनी वेळीच मदत करून जखमींना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र, या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे (वय ३३) आणि ब्रिजेश हेमंत जोशी (वय ३०) यांचा गंभीर दुखापतींमुळे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

या अपघातात वैभव घेनंद (३८), पवन चौरसिया (२५), कुणाल काशीद (२६) यांच्यासह लावण्या (वय ५) आणि दिव्या गनेर (वय ७) या दोन चिमुकल्या मुली जखमी झाल्या आहेत. जखमींवर जी. टी. रुग्णालय, जे. जे. रुग्णालय, रिलायन्स आणि सैफी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.गणेशमूर्ती कोसळण्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून, पोलीस व अग्निशमन दलाकडून या घटनेची सखोल चौकशी करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या या दुर्दैवी प्रसंगाने भुलेश्वर परिसरात आणि गणेश भक्तांमध्ये तीव्र शोककळा पसरली आहे.


हेही वाचा
सर्व पहा
महत्वाच्या बातम्या
सर्व पहा