पणजी :राज्यात गेल्या तीन वर्षांत सरासरी ३२ हजार हेक्टर शेतजमिनीत भाताची लागवड करण्यात आली असून, या कालावधीत एकूण ३ लाख ७४ हजार ४३९ टन भाताचे उत्पादन झाले आहे. २०२४-२५ मध्ये अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान होऊन उत्पादनात घट झाली होती. मात्र, २०२५-२६ मध्ये उत्पादनात पुन्हा वाढ झाली, अशी माहिती कृषी संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
२०२३-२४ ते २०२५-२६ या तीन वर्षांच्या कालावधीत गोव्यात एकूण ९७ हजार ५६८ हेक्टर जमिनीत भाताची लागवड झाली. या कालावधीत ३ लाख ७४ हजार ४३९ टन भाताचे उत्पादन झाले. पावसाळी हंगामात २३ हजार ८७९ हेक्टर जमिनीतून २ लाख ६० हजार टन, तर रब्बी हंगामात ८ हजार ५९९ हेक्टर जमिनीतून १ लाख १४ हजार टन भाताचे उत्पादन झाले.
अवकाळी पावसाचा २०२४-२५ मध्ये मोठा फटका
२०२३-२४ मध्ये ३२ हजार ४७७ हेक्टर जमिनीत भाताची लागवड झाली आणि १ लाख ४२ हजार टन उत्पादन झाले. मात्र, २०२४-२५ मध्ये अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले. या वर्षी लागवडीखालील क्षेत्रात १३६ हेक्टरने वाढ झाली असतानाही भात उत्पादनात तब्बल २७ हजार १७८ टनांची घट झाली.
२०२५-२६ मध्ये भात लागवडीचे क्षेत्र १३५ हेक्टरने कमी झाले. मात्र, हवामानातील तुलनेने अनुकूल परिस्थिती आणि उत्पादनक्षमतेत सुधारणा झाल्याने भात उत्पादनात पुन्हा वाढ झाली. या वर्षी उत्पादनात २ हजार ६२७ टनांची वाढ नोंदवण्यात आली.
२०२३-२४ मध्ये गोव्यात प्रतिहेक्टरी ४ हजार ३७४ किलो भाताचे उत्पादन झाले होते. २०२४-२५ मध्ये अवकाळी पावसाचा परिणाम झाल्याने ही उत्पादकता घटून ३ हजार ५२२ किलोवर आली. त्यानंतर २०२५-२६ मध्ये प्रतिहेक्टरी उत्पादन पुन्हा वाढून ३ हजार ६१८ किलो झाले.
- २०२३-२४ : ३२ हजार ४७७ हेक्टर लागवड; १ लाख ४२ हजार टन उत्पादन.
- २०२४-२५ : लागवड क्षेत्रात १३६ हेक्टर वाढ; मात्र उत्पादनात २७ हजार १७८ टनांची घट.
- २०२५-२६ : लागवड क्षेत्रात १३५ हेक्टर घट; मात्र उत्पादनात २ हजार ६२७ टनांची वाढ.


