लोकांच्या संपर्कात राहा; भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांचा सल्ला

दामू नाईक यांनी घेतली दिल्लीत भेट : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd August, 09:35 pm
लोकांच्या संपर्कात राहा; भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांचा सल्ला

गोव्यात शुक्रवारी मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर रात्रीत तयार केलेला अहवाल घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक दिल्लीला रवाना झाले. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेऊन गोव्यात भाजप सरकार पुढील काही महिन्यांत कशा पद्धतीने काम करणार आहे, याची माहिती दिली आणि मंत्र्यांच्या कामगिरीचा अहवालही सादर केला.

या बैठकीत गोव्यातील आगामी कामांचा रोड मॅप सादर करण्यात आला. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका, गोव्यात भाजपकडून सुरू असलेले संघटनात्मक कार्य आणि सरकारच्या कामगिरीवर सविस्तर चर्चा झाली. तसेच पक्षाच्या नेत्यांनी लोकांच्या सतत संपर्कात राहावे, असा सल्ला राष्ट्रीय अध्यक्षांनी दिल्याचे दामू नाईक यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना सांगितले.

या बैठकीला दामू नाईक यांच्यासह आमदार संकल्प आमोणकर आणि सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आणि संघटनात्मक कामकाजावर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली.

पुढील तीन-चार महिन्यांच्या कामांवर लक्ष

शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि दामू नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या बैठकीत गोव्यात पुढील तीन-चार महिन्यांत पूर्ण करावयाच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणुकीपूर्वी पूर्ण करता येणाऱ्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश पक्षातील मंत्री आणि आमदारांना देण्यात आले.

भाजपमधील मंत्री आणि आमदारांनी एकमेकांच्या विरोधात कोणतीही विधाने करू नयेत. काही समस्या किंवा मतभेद असल्यास त्यावर आधी पक्षांतर्गत चर्चा करावी, असा सल्ला मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी दिला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही सर्वांनी आपल्याशी चर्चा करावी; मात्र प्रसारमाध्यमांशी बोलताना किंवा जाहीरपणे परस्परविरोधी विधाने करू नयेत, असे स्पष्ट केले.

निवडणुकीपूर्वी कामांना प्राधान्यआगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने पुढील तीन-चार महिन्यांत पूर्ण करता येणाऱ्या कामांवर लक्ष केंद्रित करावे, तसेच पक्षातील मंत्री आणि आमदारांनी शिस्त पाळून एकजुटीने काम करावे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
मंत्रिमंडळातील रिक्त जागेचा निर्णय लांबणीवर
  • मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्याचा विषय प्रदीर्घ काळापासून प्रलंबित होता. तो शुक्रवारी मार्गी लावण्यात आला. याशिवाय लोकप्रतिनिधींमध्ये शिस्त आणण्यासाठी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली, अशी माहिती बैठकीला उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.
  • रवी नाईक यांच्या निधनानंतर मंत्रिमंडळात एक जागा रिक्त आहे. मात्र, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासोबत या विषयावर कोणतीही चर्चा झाली नसून, सध्यातरी मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नाहीत, असे दामू नाईक यांनी स्पष्ट केले.
  • पक्षातील वरिष्ठ सूत्रांनुसार, ६ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गोव्यात येणार असून, त्यावेळी मंत्रिमंडळातील रिक्त जागेविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.
आरोग्य सुविधा, कर्मचारी भरतीची मागणी

शुक्रवारच्या बैठकीत पक्षातील शिस्तीवर भर देतानाच आरोग्य क्षेत्रातील प्रलंबित विषयांवर सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी काही नेत्यांनी केली. प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये पुरेशा सुविधा नसल्यामुळे रुग्णांना वारंवार गोमेकॉमध्ये पाठवावे लागते. हा प्रकार कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवरच आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

आरोग्य क्षेत्रात डॉक्टर, कर्मचारी आणि तंत्रज्ञांची कमतरता असून, आवश्यक उपकरणांचीही गरज आहे. त्यामुळे सरकारने कर्मचारी भरती प्रक्रियेकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुढील दोन-तीन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला.

भाजपच्या आगामी कार्यक्रमांचे नियोजन

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गोव्यातील आगामी कार्यक्रम, त्यांची रूपरेषा आणि नियोजन याविषयी माहिती मांडण्यात आली. या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.

कोटभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गोव्यातील आगामी कार्यक्रम, त्यांची रूपरेषा आणि नियोजन याविषयी माहिती मांडण्यात आली असून, या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत.

— दामू नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष
हेही वाचा
सर्व पहा