मडगाव येथील पत्रकार परिषदेत बोलताना आलेक्सिओ दा कोस्टा. सोबत इतर.
मडगाव : राज्यात इमारतींना वाढीव एफएआर आणि बांधकाम उंचीसाठी देण्यात आलेल्या कथित बेकायदेशीर मंजुरींची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस नेते आलेक्सिओ दा कोस्टा यांनी केली. अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई न केल्यास नागरी पायाभूत सुविधांवर गंभीर परिणाम होण्याचा इशाराही त्यांनी दिला.
योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध नसताना इमारतींना अतिरिक्त मजले आणि वाढीव उंचीला परवानगी देणे म्हणजे जनतेच्या सुरक्षिततेशी खेळ असल्याचे दा कोस्टा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नगर नियोजन खाते तसेच स्थानिक प्रशासनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करून काही विकासकांना नियमांपेक्षा अधिक एफएआर आणि मजल्यांची मंजुरी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
संबंधित प्रकल्पांच्या मंजुरी फायली, नकाशे आणि कागदपत्रांच्या आधारे प्रत्यक्ष बांधकाम आणि मंजूर आराखड्यात तफावत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. याबाबत वेळीच कठोर पावले उचलली नाहीत तर भविष्यात गोव्यात पायाभूत सुविधा आणि नागरी व्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा आलेक्सिओ दा कोस्टा यांनी दिला.
अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी
अनधिकृत बांधकामांमुळे रस्ते, सांडपाणी, पाणी आणि वीजपुरवठ्यावर ताण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. वाढीव एफएआर व इमारतींच्या उंचीच्या मंजुरींची निष्पक्ष चौकशी करून नियमबाह्य बांधकामांना काम थांबवा नोटीस द्यावी. तसेच नियम डावलून मंजुरी देणाऱ्या किंवा अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी दा कोस्टा यांनी केली.


