इंडिगोच्या ‘कॅबिन क्रू’ला भावली मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची ‘स्वयंपूर्ण गोवा’ संकल्पना

पत्र ‌लिहून केले कौतुक; पत्रातील मजकुराने मुख्यमंत्रीही भारावले : इंडिगो कंपनीच्या विमानाच्या कॅबिन ‘क्रू‘ने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून त्यांचे व त्यांच्या योजनांचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ‘स्वयंपूर्ण गोवा’ संकल्पना विशेष भावल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
इंडिगोच्या ‘कॅबिन क्रू’ला भावली मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची ‘स्वयंपूर्ण गोवा’ संकल्पना

पणजी : इंडिगो कंपनीच्या विमानाच्या ‘कॅबिन क्रू‘ने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून त्यांचे व त्यांच्या योजनांचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ‘स्वयंपूर्ण गोवा’ संकल्पना विशेष भावल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

मुख्यमंत्र्यांनीही ‘कॅबिन क्रू’ने लिहिलेल्या पत्रातील मजकुराने भारावून गेल्याचे नमूद करीत पत्र सामाजिक माध्यमांवर शेअर केले आहे. आणि इंडिगोमधून प्रवास करणे नेहमीच आनंददायी असल्याचे म्हटले आहे.  सामाजिक माध्यमांवरही या पत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे व अनेकांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. 


इंडिगोच्या कॅबिन क्रूने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,  आपला आमच्यासोबतचा प्रवास आमच्या कर्मचारी वर्गासाठी (क्रूसाठी) खरोखरच एक विशेष क्षण आहे. आणि आपल्याला आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.

जनसेवेतील आपला प्रवास आणि प्रगती व विकासासाठीचे आपले निरंतर योगदान खरोखरच प्रेरणादायी आहे. गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री म्हणून, आपले नेतृत्व जनसेवा, सर्वसमावेशक विकास आणि राज्यातील जनतेच्या आकांक्षांप्रती असलेली आपली दृढ कटिबद्धता दर्शवते.

‘स्वयंपूर्ण गोवा’ संकल्पना ‘कॅबिन क्रू’ना भावली 

'स्वयंपूर्ण गोवा' ही आपली संकल्पना,  जी स्वावलंबन, समुदायांचे सक्षमीकरण, स्थानिक उपजीविकेला बळकटी देणे आणि लोकांसाठी संधी निर्माण करण्यावर भर देते. आणि आपल्या नेतृत्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या उपक्रमाद्वारे महिला सक्षमीकरण, सरकारी योजनांचा सुलभ लाभ आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. स्वावलंबी, सक्षम आणि प्रगत गोवा घडवण्याच्या दिशेने केलेले हे निरंतर प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

कॅबिन क्रू म्हणून, आम्ही आपले नेतृत्व, शिस्त आणि जबाबदारी याकडे आदराने पाहतो. आपला प्रवास आम्हाला याची आठवण करून देतो की,  जनसेवा असो किंवा आमच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्यांचे पालन असो,  शेवटी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आपले कर्तव्य पार पाडणे हेच महत्त्वाचे असते. गोवा आणि आपल्या राष्ट्रासाठी आपण करत असलेल्या सेवेबद्दलचा आमचा आदर व्यक्त करण्यासाठी क्रूच्या वतीने हा एक छोटासा प्रयत्न आहे.

आपल्या सेवा आणि नेतृत्वाच्या प्रवासात आपल्याला निरंतर यश मिळो आणि अधिक सक्षम व उत्तम भारत घडवण्याच्या कार्यात आपले कार्य असेच प्रेरणादायी ठरत राहो, हीच सदिच्छा! असे या पत्रात नमूद केले आहे.  विमानातील संपूर्ण क्रूच्या वतीने हरिप्रिया, शिवानी, तनु आणि दीपाबली यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना हे पत्र लिहिले आहे.  

हेही वाचा
सर्व पहा