पणजी : फोंडा तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. पीडित मुलीची वयाची पुष्टी करण्यासाठी कोणतेही अधिकृत जन्म दाखल्याचे कागदपत्र तसेच वैद्यकीय अहवाल उपलब्ध नव्हता. याशिवाय, डीएनए चाचणीचा अहवाल नकारात्मक आला होता, असे निरीक्षण नोंदवून मेरशी येथील पाॅक्सो न्यायालयाने संशयित युवकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. याप्रकरणी न्या. डाॅ. पूजा कवळेकर यांनी आदेश दिला.
म्हार्दोळ पोलिसांनी २६ आॅगस्ट २०२३ रोजी याबाबत गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली. त्यात युवकाने २५ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री ९ वा. सुमारास तिच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला फोंडा परिसरातील एका डोंगरावर नेले, तिथे तिला मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. याची दखल घेऊन पोलिसांनी १९ वर्षीय युवकाविरोधात भा. दं. संहितेच्या कलम ३२३, ३७६ आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. याच दरम्यान १४ सप्टेंबर २०२३ रोजी पॉक्सो न्यायालयाने युवकाला सशर्त जामीन मंजूर केला.
पोलिसांनी तपासपूर्ण करून १९ ऑक्टोबर २०२३ रोजी संशयित युवकाविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन १५ जानेवारी २०२४ रोजी न्यायालयाने आरोप निश्चित करून खटला सुरू केला.
न्यायालयात सुनावणी झाली असता, अॅड. व्ही. गावकर यांनी युवकाच्या बाजूने युक्तिवाद केला. त्यात त्यांनी पीडित मुलीने दिलेल्या साक्षीमध्ये शरीरसंबंध हे बळजबरीने किंवा संमतीशिवाय झाल्याचे सिद्ध झाले नाही. याशिवाय, डीएनए चाचणीचा अहवाल नकारात्मक आला, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने युवकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.
युवती ‘अल्पवयीन’ ठरत नसल्याचा निष्कर्ष
पीडितेच्या वयाची पुष्टी करण्यासाठी कोणतेही अधिकृत जन्मदाखल्याचे कागदपत्र उपलब्ध नाही. वैद्यकीय चाचणीच्या आधारेही संबंधित युवती अल्पवयीन असल्याचे निश्चितपणे सिद्ध होत नसल्याचे नमूद करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, वैद्यकीय चाचणीत पीडितेचे वय १८ वर्षे असून त्यात सहा महिने कमी-अधिक फरक असू शकतो, असे निष्पन्न झाले. कायद्यानुसार वयाबाबत निर्माण झालेला संशय संशयिताच्या बाजूने गृहीत धरण्यात आला. त्यामुळे पीडित युवती पॉक्सो कायद्याच्या कक्षेत ‘अल्पवयीन’ ठरत नसल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला.


