कातकरी समाजातील महेश पवार आयटीआय उत्तीर्ण

पालकांच्या प्रयत्नांना यश : कातकरी विद्यार्थ्यांसाठी ठरणार प्रेरणास्रोत

Story: गोवन वार्ता। वार्ताहर |
20th August, 11:29 pm
कातकरी समाजातील महेश पवार आयटीआय उत्तीर्ण

केरी सत्तरी : शिक्षणापासून अनेकदा वंचित राहिलेल्या निरंकाल येथील कातकरी समाजातील महेश अंकुश पवार याने आयटीआयची परीक्षा उत्तीर्ण करून महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. गोव्यातील कातकरी समाजातून आयटीआय उत्तीर्ण होणारा तो पहिला विद्यार्थी ठरल्याने त्याचा शैक्षणिक प्रवास समाजातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
महेश शैक्षणिकदृष्ट्या काहीसा कमजोर असल्याने त्याला शिक्षणात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. निरंकाल येथील माध्यमिक विद्यालयात नववीत नापास झाल्यानंतर त्याचे शिक्षण अर्धवट राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, पालक आणि सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांमुळे त्याच्या शिक्षणाची वाटचाल सुरू राहिली.
गेल्या वर्षी आठवी उत्तीर्ण झाल्याच्या प्रमाणपत्राच्या आधारे महेशला फर्मागुडी येथील आयटीआयमध्ये वेल्डर ट्रेडच्या एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. त्याने हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करून आयटीआयची परीक्षा उत्तीर्ण केली.
महेशचे वडील अंकुश आणि आई बिमली पवार यांनी आपल्या मुलाने शिक्षण घ्यावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले. महेशने विविध शाळांमध्ये शिक्षण घेतले. काही काळ तो म्हापसा येथील बहुजन हिताय हॉस्टेलमध्ये राहून कुचेली येथे शिक्षण घेत होता. कोविड काळात त्याच्या शिक्षणात खंड पडला. त्यानंतरही अनेक अडचणींना सामोरे जात त्याने शिक्षण सुरू ठेवले.
कातकरी मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या संवेदन केंद्राने महेशला योग्य मार्गदर्शन आणि मदत केली. गेल्या चार वर्षांपासून कातकरी वस्तीत लर्निंग सेंटर चालविणाऱ्या या संस्थेच्या प्रयत्नांमुळे महेशला आयटीआयमध्ये प्रवेश मिळू शकला.
संवेदन केंद्राच्या अध्यक्षा माधवी राणे यांनी महेशचे यश हे कातकरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे महत्त्वपूर्ण फलित असल्याचे सांगितले. शिग्नेव्हाळ येथील सरकारी प्राथमिक विद्यालय, गणनाथ इंग्लिश हायस्कूल आणि फर्मागुडी आयटीआयच्या शिक्षकांचेही त्याच्या यशात योगदान लाभले.
महेशचा संघर्षमय शैक्षणिक प्रवास कातकरी समाजातील विद्यार्थ्यांसाठी नवी प्रेरणा ठरत असून, योग्य मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि शिक्षणाची जिद्द असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते, हे त्याने दाखवून दिले आहे.
आणखी शिक्षण घेण्याचा निर्धार
एक वर्षाचा वेल्डर ट्रेडचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर महेशला आता प्लंबर ट्रेडमध्ये आणखी एक वर्ष आयटीआयचे शिक्षण घेण्याची इच्छा आहे. दोन वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर दहावी उत्तीर्ण होण्याची संधी मिळत असल्याने पुढील शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्धार त्याने व्यक्त केला आहे.

हेही वाचा
सर्व पहा