‘यूपीए’ने २०१३ मध्येच आणला होता एसटींच्या राजकीय आरक्षणाचा कायदा!

गिरीश चोडणकर यांचा दावा : राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
28 mins ago
‘यूपीए’ने २०१३ मध्येच आणला होता एसटींच्या राजकीय आरक्षणाचा कायदा!

पणजी : यूपीए सरकारने २०१३ मध्ये एसटी समाजासाठी राजकीय आरक्षणाचा कायदा आणला होता. देशातील अन्य राज्यांनी हा कायदा वापरून स्थानिक एसटी समाजाला राजकीय आरक्षण दिले. मात्र, मागील तेरा वर्षे गोव्यातील भाजप सरकारने या कायद्याची अंमलबजावणी न करता येथील एसटी समाजावर अन्याय केल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली.

राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त गुरुवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार कार्लुस फेरेरा, माजी खासदार फ्रान्सिस सार्दीन व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

चोडणकर यांनी सांगितले की, यूपीए सरकारने केलेल्या कायद्यानुसार एसटी समाजाची लोकसंख्या अधिक असणाऱ्या राज्यात राजकीय आरक्षण देता येते. मात्र, भाजप सरकारने असे न करता येथील एसटी समाजाला वंचित ठेवले. मागील काही वर्षे भाजप सरकार नवीन कायदा आणल्याचे सांगत आहे. मात्र अद्याप याबाबत एसटी समाजामध्ये संभ्रम आहे. गोवा सरकारने अर्थसंकल्पामध्ये एसटी, ओबीसी समाजासाठी हजारो कोटींची तरतूद केली आहे. मात्र, हा निधी समाजावर खर्च केला जात नाही. या निधीचे काय केले जाते याचे उत्तर सरकारने देणे आवश्यक आहे.

ते म्हणाले, राजीव गांधी यांनी देशात संगणकीकरणाला सुरुवात केली. आज आयटी क्षेत्रात देश आघाडीवर आहे. याचा पाया राजीव गांधी यांनी घातला होता. राजीव गांधी यांनी आयटी धोरण आणल्यावर संसदेत आणि बाहेर भाजपने याला प्रचंड विरोध केला. मात्र, या आयटी क्रांतीचा दुरुपयोग आज भाजपच सर्वाधिक करताना दिसत आहे.

भाजपच्या आशीर्वादानेच ड्रग्ज व्यवसाय

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था याआधीच रसातळाला गेली आहे. शाळा, महाविद्यालय आणि आता कोलवाळ तुरुंगातही गांजा पोहोचला आहे. देशातील इतर राज्यांच्या पोलिसांना गोव्यात ड्रग्ज सापडतात. मात्र, गोवा पोलिसांना ते सापडत नाहीत हे आश्चर्य आहे, असे चोडणकर यांनी सांगितले.

भाजप काळात सर्वत्रच कॅसिनो : सार्दीन

कॅसिनोंची सुरुवात काँग्रेस काळात झाली असली, तरी आम्ही केवळ दोन ते तीन कॅसिनोंनाच परवानगी दिली होती. यामागे पर्यटन वाढावा असा आमचा हेतू होता. आज, मात्र सगळीकडेच कॅसिनो दिसू लागले आहेत, असे फ्रान्सिस सार्दीन यांनी सांगितले. 

हेही वाचा
सर्व पहा