वास्को : वेर्णा व सांकवाळ औद्योगिक वसाहती, कुठ्ठाळी, सांकवाळ, वेळसाव, कासावली ग्रामपंचायती तसेच गोव्यातील सर्वात मोठी झुआरीनगरची झोपडपट्टी, वाढणारी लोकसंख्या व वाहनांची संख्या इत्यादीचा विचार करताना वेर्णा पोलीस स्थानकात पोलीस कर्मचारी संख्या मंजूर केलेल्या संख्येपेक्षा कमीच आहेच. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते रोकझिन डिसोझा यांनी वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक आनंद शिरोडकर यांना निवेदन दिले आहे. वेर्णा पोलीस स्थानकातील रिक्त पदे भरण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे.
वेर्णा पोलीस स्थानकासाठी काही वर्षांपूर्वी ११० पदे मंजूर करण्यात आली होती. ती वाढविण्याची गरज असताना ती कमी झाली असल्याचे दिसून येत आहे. या पोलीस स्थानकात सध्या ७६ कर्मचारी कार्यरत आहेत, तर ३४ पदे रिक्तच आहे. त्यामुळे वेर्णा पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासमोर काही समस्या उभ्या राहिल्या आहेत. या पोलीस स्थानकाच्या हद्दीत वेर्णा औद्योगिक वसाहतीसह सांकवाळ औद्योगिक वसाहतीचा समावेश आहे. चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींच्या हद्दीत एखादी घटना घडली तर तेथे पोहचण्यासाठी विलंब होतो. या पोलीस स्थानकाची हद्द मोठी असल्याने मध्यंतरी सांकवाळ येथे पूर्ण दर्जाचे पोलीस स्थानक उभारण्यासाठी तत्कालीन आमदार व मंत्री एलिना साल्ढाणा यांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी जागाही निश्र्चित करण्यात आली होती. तथापी त्या निर्णयाची अद्याप कार्यवाही झाली नाही. या पोलीस स्थानकाच्या हद्दीत कुठ्ठाळी व झुआरीनगर अशा दोन पोलीस चौक्यांचा समावेश आहे. तथापी तेथेही पुरेसे कर्मचारी नसल्याने त्या फक्त नावापुरत्या आहेत. त्यामुळे संपूर्ण भार वेर्णा पोलीस स्थानकावर पडतो.
झुआरीनगर येथे मोठी झोपडपट्टी असल्याने तेथे पूर्ण क्षमतेच्या पोलीस स्थानकाची गरज व्यक्त करण्यात आली आहे. जेणेकरून वेर्णा पोलीस स्थानकावरील अतिरिक्त भार कमी होण्यास मदत होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सार्वजनिक सुरक्षेसाठी पोलिसांची गरज
पोलीस स्थानक हद्दीतील लोकसंख्या, उद्योगधंदे, वाहने आदींची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे तेथे नव्याने सर्व्हे करून किती पोलीस कर्मचाऱ्यांची गरज आहे, यासंबंधी आढावा घेण्याची गरज आहे. गुन्हेगारी वाढू नये, सार्वजनिक सुरक्षेसाठी पोलिसांची योग्य संख्या असण्याची गरजही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.


