म्हापसा : कळंगुट पंचायतीने बागा येथील टिटोज लेन परिसरात वैध परवान्यांशिवाय सुरू असलेल्या चार नाईट क्लबवर गुरुवारी सीलची कारवाई केली. लिजेंड, कर्मा, डाऊन द रोड (डीटीआर) आणि हवेली या क्लबचा त्यात समावेश आहे. आगामी काही दिवसांत परिसरातील एकूण १७ क्लबवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच जोजफ सिक्वेरा यांनी दिली.
गुरुवारी २० रोजी सायंकाळी पंचायतीने ही कारवाई केली. ही कारवाई सरपंच जोजफ सिक्वेरा व सचिव अर्जुन वेळीप यांच्या उपस्थित करण्यात आली. या सर्व क्लबना कळंगुट पंचायतीने कामकाज थांबवण्याबाबत नोटीस बजावली होती. मात्र, संबंधित व्यवस्थापनाने या आदेशाविरुद्ध पंचायत संचालनालयाकडे आव्हान दिले होते. परंतु संचालनालयाने ही याचिका फेटाळून लावली गेली. त्यानंतर पंचायतीने ही कायदेशीर कारवाई केली आहे.
सरपंच जोजफ सिक्वेरा यांनी सांगितले की, आम्ही चार क्लब सील केले आहे. शुक्रवारी आणि त्यानंतर आगामी तीन-चार दिवसांत ही मोहीम सुरू ठेवून टिटोज लेन आणि आसपासचे एकूण १७ क्लब सील करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.


