ड्रग्ज प्रकरणातील संशयिताला सशर्त जामीन मंजूर

८६ हजारांच्या ड्रग्जसह अटक; ५० हजारांच्या वैयक्तिक हमीवर दिलासा

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
5 hours ago
ड्रग्ज प्रकरणातील संशयिताला सशर्त जामीन मंजूर

म्हापसा : कळंगुट पोलिसांनी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपी सागर मोरजकर याचा सशर्त जामीन अर्ज म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. आरोपीला ५० हजार रुपयांची वैयक्तिक हमी तसेच तितक्याच रकमेचा स्थानिक हमीदार सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाने जामीन मंजूर करताना काही अटीही घातल्या आहेत. खटल्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत आरोपीने दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळच्या वेळेत संबंधित पोलीस स्थानकात हजेरी लावावी. तसेच तपास अधिकाऱ्याला पूर्वसूचना दिल्याशिवाय राज्याबाहेर जाऊ नये आणि न्यायालयाने घातलेल्या अन्य अटींचे पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
२७ जुलै रोजी आगरवाडा-कळंगुट येथे पोलिसांनी छापा टाकून संशयित सागर मोरजकर याला ड्रग्ज प्रतिबंधक कायद्यान्वये अटक केली होती. त्याच्याकडून सुमारे ८६ हजार रुपये किमतीची ८.६ ग्रॅम एक्स्टसी पावडर जप्त करण्यात आली होती. याशिवाय १ हजार रुपये रोख रक्कम आणि जीए ०३ बीए ९८०१ क्रमांकाची एक्टिव्हा स्कूटरही पोलिसांनी जप्त केली होती.
जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांनी एनडीपीएस कायद्याच्या कलम ३७ मधील कठोर तरतुदी या प्रकरणात लागू होत नसल्याचा युक्तिवाद केला. तर सरकारी वकिलांनी आर्थिक व्यवहारांची साखळी तपासण्यासाठी आरोपीला कोठडीत ठेवणे आवश्यक असल्याचे सांगत जामीन अर्जाला विरोध केला.
कोठडीची गरज नसल्याचे न्यायालयाचे निरीक्षण
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने जामीन नाकारण्यासाठी सरकारी पक्षाने दिलेली कारणे पुरेशी नसल्याचे नमूद केले. आरोपी न्यायालयीन कोठडीत असून त्याच्या आर्थिक व्यवहार आणि बँक खात्यांची तपासणी त्याला कोठडीत न ठेवताही करता येऊ शकते, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सागर मोरजकर याला सशर्त जामीन मंजूर केला.      

हेही वाचा
सर्व पहा