गोवा ऑलिम्पिक असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी संध्या पालयेकर यांची बिनविरोध निवड

क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
17th August, 11:54 pm
गोवा ऑलिम्पिक असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी संध्या पालयेकर यांची बिनविरोध निवड

पणजी : मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष आणि मॉडर्न पेंटॅथलॉन असोसिएशन ऑफ गोवाच्या सचिव संध्या पालयेकर यांची गोवा ऑलिम्पिक असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे गोव्याच्या क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गोव्यातील क्रीडा क्षेत्राचा विकास आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संध्या पालयेकर यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांची ही बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षांत गोव्याच्या खेळाडूंनी राष्ट्रीय खेळ, राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा तसेच अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करत राज्याचा नावलौकिक वाढवला आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल मॉडर्न पेंटॅथलॉन असोसिएशन ऑफ गोवाच्या कार्यकारिणी समिती, सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नव्या जबाबदारीत त्यांना भरभरून यश मिळो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याचे खेळाडू क्रीडा जगतात नवनवीन शिखरे सर करोत, अशा शुभेच्छा क्रीडाप्रेमींकडून व्यक्त केल्या जात आहेत.